rekha jare

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे फरार घोषित

क्राईम न्यूज ऑफ द डे पश्चिम महाराष्ट्र

नगर, दि.4 : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित सूत्रधार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने अखेर फरार घोेषित केले. न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी त्याबाबतचा आदेश आज दिला. दरम्यान, येत्या 9 एप्रिलपर्यंत बोठे याने स्वतःहून न्यायालयासमोर हजर व्हावे. अन्यथा पुढील कारवाई सुुरु करण्यात येईल, असेही आदेश न्यायालयाने दिले.

पोलिसांनी बोठेला फरार घोषित करण्यासंदर्भात न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज अंतिम सुनावणी झाली. रेखा जरे खून प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बोठे हा तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. तो पोलिसांना सापडत नसल्याने, त्याला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज केला होता. 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगावच्या घाटात हत्या झाली. त्यातील पाच आरोपी तत्काळ जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालेले आहे. याच आरोपींकडून बोठे याचे नाव समोर आलेले होते. बोठे यानेच जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, या हत्याकांडाला आता तीन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, अद्यापही बोठे सापडलेला नाही. त्याने जिल्हा न्यायालयात व औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी दाखल केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळलेले आहेत. बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध पारनेर न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट मंजूर करून घेतलेले आहे. दरम्यान, जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुध्द नुकतेच (दि.26) पोलिसांनी पारनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. बोठे याच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकार्‍यांनी दिली.

Tagged