antigen test swab

खाजगी नर्सींग होममधील रूग्णांना कोरोना चाचणी बंधनकारक

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

बीड : खाजगी नर्सींग होममधील दाखल होणार्‍या व तपासणीसाठी येणार्‍या रूग्णांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी गुरुवारी दिले आहेत.

  आदेशात म्हटले आहे की, खाजगी नर्सींग होममध्ये उपचार घेण्यासाठी येणार्‍या रूग्णांची कोरोना चाचणी न करताच त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातून नर्सींग होमचे कर्मचारीही बाधित होऊ शकतात. त्यामुळे खाजगी नर्सींग होममध्ये दाखल होणार्‍या रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी तर बाह्यरूग्ण म्हणून आलेल्या रूग्णांची रॅपीड अ‍ॅन्टीजेन चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. रूग्णांच्या तपासणीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी समन्वय अधिकार्‍याची नियुक्ती करावी. तसेच, जिल्ह्यातील सर्व खाजगी नर्सींग होममधील आंतर रूग्ण विभागात रूग्ण दाखल होताच चाचणी करावी. तसेच, बॉम्बे नर्सींग होम अंतर्गत 20 पेक्षा जास्त खाटांची परवानगी असल्यास रूग्णालयात आरटीपीसीआर चाचणीसाठीचे नमुने घेण्याची सुविधा निर्माण करणे बंधनकारक असेल. त्याबाबतचे प्रशिक्षण व सहाय्य विनाशुल्क जिल्हा रूग्णालयाकडून देण्यात यावे. तसेच, रॅपीड अ‍ॅन्टीजेन चाचणीसाठी खाजगी रूग्णालय, प्रयोगशाळांना परवानगी देण्यात यावी. तसेच त्याच्या कीटसाठी कमाल मर्यादेपक्षा अधिक दर आकारता येणार नाही, असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेशात म्हटले आहे.
पॉझिटिव्ह रूग्ण दर झपाट्याने वाढला
5 मार्चपासून पॉझिटिव्ह रूग्णांचा दर 5 टक्क्यांवरून तब्बल 10 ते 15 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. ही बाब जिल्हावासींयासाठी चिंताजनक असून नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

Tagged