राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बीड दि.21: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अवैधरित्या होणार्या दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. शुक्रवारी (दि.21) बीड शहरातील कब्बाडगल्ली येथून 57 बॉक्स देशी दारु जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकजण फरार आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कबाडगल्ली येथील अंकुश वसंतराव कदम याच्या राहत्या घरी धाड टाकली. यावेळी वाहन पार्किंगच्या जागेत जिन्याखाली देशी दारुचा साठा लपवून ठेवला असल्याचे दिसून आले. देशी दारु बॉबी संत्रा या ब्रँडचे 180 मिली क्षमतेचे 57 बॉक्स ज्याची किंमत एक लाख 64 हजार 160 रुपये एवढी आहे. आरोपी अंकुश वसंतराव कदम (वय 44 रा.कबाड गल्ली) बीड याने लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने सदर दारूसाठा ठेवला होता. आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक कडवे, दुय्यम निरीक्षक घोरपडे, नायबळ, शेळके, गायकवाड, जवान नजमा शेख, मोरे, मस्के, सादेक अहमद, गोणारे व जवान वाहन चालक जारवाल, शेळके यांनी केली.
दारु खरेदीसाठी आलेला पकडला
कदम याच्याकडून देशी दारू खरेदीसाठी आलेला दादासाहेब सदाशिव कांबळे (वय 42 रा.पंचशील नगर बीड) यास अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,1949 चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
लॉकडाऊनकाळात एक
कोटीची मुद्देमाल जप्त
लॉकडाऊनमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध दारुविक्री विरोधात राबविलेल्या मोहिमेत 97 गुन्हे नोंदविले ओहत. यात 52 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर कालावधीत देशी विदेशी दारुच्या मुद्देमाल व वाहनासह एकूण रुपये 1 कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध धाबे, दारु विक्री केंद्रे तसेच हातभट्टीच्या ठिकाणांवर वारंवार विभागाकडून धाडी टाकण्यात येत आहेत. लॉकडाऊन कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील, याकरिता विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. अवैध दारू, हातभट्टीची दारू व परराज्यातील दारू विरोधात सातत्याने मोहीमा राबविण्यात येत असून यापुढेही अशा कारवाया सुरू राहील.
नितीन धार्मिक ,
उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक