200 कोटी रुपयांची वक्फची 177 एकर जमीन नावची केल्या प्रकरणात आष्टी पोलीसांकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ

आष्टी बीड

बालाजी मारगुडे । बीड

दि.13 : सर्वधर्मीय देवस्थानच्या जमीनी हडप करण्याचे प्रकार मागील काही वर्षात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले. ‘कार्यारंभ’ने या प्रकरणात आवाज उठविल्यानंतर अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यातच आता वक्फ बोर्डाकडून गुन्हे दाखल करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. पहिली तक्रार 3 जून रोजी आष्टी ठाण्यात दाखल करण्यात आली मात्र पोलीसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. पुन्हा 8 जून रोजी या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांना दुसरे पत्र देण्यात आले. मात्र तरीही आष्टी पोलीसांनी अद्याप काहीच कार्यवाही केलेली नाही. पोलीस कुणाच्या दबावाखाली येऊन टाळाटाळ करीत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.

आष्टी आणि जामखेडच्या मध्ये ऐन मोक्याच्या ठिकाणी गैबी पीर साहेब यांच्या दर्ग्याची सुमारे 177 एकर 61 गुंठे जमीन चिंचपूर शिवारात आहे. सर्वे नं. 65 मध्ये 17.1 हेक्टर, सर्वे नं.31 मध्ये 0.29 हेक्टर, सर्वे नं.32 मध्ये 28.21 हेक्टर, आणि सर्वे नं.35 मध्ये 26.28 हेक्टर असे जमीनीचे क्षेत्रफळ आहे. ही जमीन ऐन मोक्याची असून तिथे अर्ध्याहून अधिक क्षेत्रफळावर प्लॉटिंग देखील पाडण्यात आली आहे.

जिल्हा वक्फ अधिकार्‍यांनी दिलेली हीच ती तक्रार… पहिली तक्रार 3 जुनला दिली. तर दुसरी तक्रार 8 जुनला दिली आहे. मात्र पोलीसांकडून उडवा उडवी चालू आहे.
2

संबंधीत प्रकरणाची तक्रार वक्फ बोर्डाकडे दाखल झाली होती. त्यात वक्फ बोर्डाने त्वरीत हस्तक्षेप करीत या जमीनीवर बेकायदेशीररित्या ताबा मिळविणारे अस्लम नवाब खान, इरशान नवाब खान रा. आजाद नगर आष्टी यांच्याविरोधात वक्फ अधिनियम 1995 व इतर भादंवि कलमान्वये गुन्हा नोंद करण्यास वक्फचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी बीडचे जिल्हा वक्फ अधिकारी यांना 2 जून रोजी प्राधिकृत केले होते.
त्यानुसार जिल्हा वक्फ अधिकारी बीड यांनी 3 जून रोजी आष्टी ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, असलम नवाब खान आणि इशान नवाब खान यांच्या विरोधात बेकायदेशीररित्या हैद्राबाद ईनाम निर्मूलन कायदा 1954 चे कलम 6/3 अ सुधारणा नियम 17-8-2015 नुसार खालसा होऊन दस्त क्र.1516/15/59/2020 दुय्यम निबंधक आष्टी तर्फे खरेदी विक्री केली आहे. अस्लम नवाब खान आणि इरशान नवाब खान रा.आजादनगर आष्टी व इतर ज्यांनी ज्यांनी सदर जमीन खरेदी-विक्री केली आहे या सर्वांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी तक्रार देण्यात आली होती. मात्र तक्रार देऊन 11 दिवस उलटले मात्र अद्याप आष्टी पोलीसांनी गुन्हा नोंद केलेला नाही.

आष्टी-जामखेड रस्त्यावरील हीच ती प्लॉटिंग पाडलेली जमीन…

जमीन नावची केलेले मोहरे दुसरेच
मोठ्या व्यक्तीचे राजकीय पाठबळ आणि आर्थिक हितसंबंध असल्याशिवाय 177 एकर जमीन कुणाच्याही नावची होऊ शकत नाही. जमीन ज्यांच्या नावची करण्यात आली ती नावे केवळ एक मोहरा म्हणून वापरण्यात आली आहेत. यामागाचे मास्टरमाईंड वेगळेच आहेत. केवळ आष्टीतच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात देवस्थानच्या जमीनी अधिकार्‍यांना हाताशी धरून हडपण्याचे उद्योग लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणावर झाले होते.

ठाणेप्रमुख आमेर चाऊस म्हणतात
बीट अंमलदारांना विचारा

या प्रकरणात गुन्हा का दाखल नाही याची माहिती ‘कार्यारंभ’ने आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक आमेर चाऊस यांना विचारली असता ते म्हणाले, तक्रार आली की नाही याची मला काही माहिती नाही. तुम्ही ही माहिती चिंचपूरच्या बीट अंमलदाराला विचारा, असे म्हणून बेकायदेशीर प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

चिंचपुरचे बीट अंमलदार म्हणतात
तक्रार इकडे-तिकडे गेली असेल

कार्यारंभने चिंचपुरचे बीड अंमलदार काळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अतिशय मजेदार उत्तर दिले. संबंधीत तक्रार माझ्याकडे आलेली नाही. लॉकडाऊनमध्ये आलेली असूही शकते मात्र इकडे-तिकडे गेली असेल, बघावी लागेल, असे सांगत प्रकरणाचा मजाक करून ठेवल्याचे दिसत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतात
जिल्हाधिकार्‍यांकडे मार्गदर्शन मागविले

आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्याशी कार्यारंभने संपर्क केला असता ते म्हणाले, हा एकट्या आष्टीचा प्रश्न नाही. संपूर्ण जिल्ह्यात अशा तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे मार्गदर्शन मागविले असल्याचे लगारे म्हणाले. वास्तविक वक्फ बोर्डाच्या मालकीची जागा आहे, वक्फ बोर्डाचे जिल्हाधिकारी तक्रार देत आहेत तरीही आष्टीच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांच मार्गदर्शन हवंय. विशेष म्हणजे आपल्या हद्दीत काय तक्रार आली यापेक्षा जिल्हाभरात काय चाललंय याचा दाखल लगारे देऊ पाहतात.

जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क झाला नाही
याबाबत ‘दैनिक कार्यारंभ’ने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याशी संपर्क केला. मात्र वारंवार भ्रमनध्वनी करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलीसांनी खरेच मार्गदर्शन मागविले आहे की नाही? याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

पोलीस निरीक्षकांना देखील सहआरोपी करा – महेबूब शेख
या प्रकरणात आम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहोत. अल्पसंख्याक मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा सुरु होता. त्यांनीच या प्रकरणात गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलीस जाणीवपुर्वक गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करीत आहेत. पोलीसांनी टाळाटाळ करू नये. अन्यथा पोलीस निरीक्षकाला देखील सह आरोपी करावे, म्हणून लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे. एका साध्या व्यक्तीविरोधातील तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करीत असतील तर सगळ्यांना कळून चुकतंय की या प्रकरणात मोठे राजकीय लागेबांधे आहेत. साधा माणूस 177 एकर जमीन मिळवू शकत नाही. पोलीसांनी नुसती फिर्याद नोंद न करता या पाठीमागील खरे चेहरे देखील उजेडात आणले पाहीजेत. त्यांच्या म्होरक्याचा चेहरा लोकांसमोर येऊद्यात असे अवाहन राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी म्हटले आहे.

टिप- बातमीचा कव्हर फोटो प्रातिनिधीक आहे.

Tagged