maratha arakshan

मराठा आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा बीडमधून क्रांतीची मशाल पेटणार

न्यूज ऑफ द डे बीड

मोर्चा होणारच आहे, कुणाच्याही बुध्दीभेदाला बळी पडू नका

आज होणार्‍या मोर्चात प्रत्येक मराठ्यांनी सहभाग नोंदवावा -मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

बीड : मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मराठ्यांनी पुन्हा एकदा बीडमधून क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी सज्ज व्हावे. आरक्षणासाठीचा लढा पुन्हा पहिल्यापासून सुरु झालेला आहे. परंतु यावेळी दिर्घकालीन लढा होणार नसून मराठ्यांनी एकजूट दाखवली तर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार लवकरात लवकर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अफवा, पोलीसांच्या भितीला बळी न पडता, मोर्चा होणार की नाही या चर्चा करत न बसता मिळेल त्या वाहनातून बीडला यावे, कोण काय म्हणतंय, कुणाला मोर्चाचा किती लाभ होणार यापेक्षा आपल्याला आरक्षण मिळणे महत्वाचे आहे. समाजातील काही घटक बुध्दीभेद करण्याचं काम करीत असून सर्वच मराठ्यांनी आपआपले राजकीय जोडे बाजुला ठेऊन आज होणार्‍या क्रांती मोर्चात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सीए बी.बी.जाधव, अ‍ॅड.मंगेश पोकळे यांनी केले आहे.

आमदारकीसाठी आरक्षणाचा प्रश्न वेठीस का धरू? आ.विनायक मेटे
मेटेला आमदारकी मिळविण्यासाठी हा मोर्चा आहे असा संशय निर्माण करून समाजात दुफळी तयार करण्याचं काम विरोधक करीत आहेत. मला विचारायचं आहे की त्या लोकांचं मराठा आरक्षण लढ्यात योगदान काय? मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं म्हणून त्या आतापर्यंतच्या किती कमीट्यांना भेटल्या. त्यांनी विविध आयोगांना काय पत्रव्यवहार केला ते सांगावे. आमच्या समाजासमोर अश्रू ढाळून काही उपयोग होणार नाही. समाजासाठी आजपर्यंत मी काय काम केलं हे माझ्या समाजासमोर आहे. दुसर्‍या समाजाच्या नेत्यांनी यात तोंड खुपसू नये. ज्यांना समाजाने मतदानातून नाकारले, पक्षानेही सभागृहातील संधी नाकारली, त्यांनी आमच्या आमदारकीची अजिबात चिंता करू नये, ह्या मेटेंनी आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काम केले त्या कामासाठी समाजाने भरभरून आर्शीर्वाद दिले आहेत. हा मेटे कालही आमदार होता, आजही आमदार आहे आणि उद्याही आमदार राहील, त्यासाठी मला आरक्षणासारखा प्रश्न वेठीस धरण्याची गरज नाही, असा खणखणीत इशारा आ.विनायक मेटे यांनी विरोधकांना दिला आहे.
पुढे बोलताना आ.मेटे म्हणाले, जिल्ह्यातील काहींना केवळ मी मोठा होतो की काय एवढीच चिंता लागून असते. त्यामुळे त्यांना माझ्यावर टिका करायची असते. त्यात काही आपल्याच समाजाच्या प्रस्थापितांना ही चिंता जरा जास्तच लागून असते. मी आरक्षणाचा लढ्यात आज आलेलो नाही. 1982 सालापासून आरक्षण लढ्यात सहभागी आहे. स्व.आण्णासाहेब पाटील यांनी ज्यावेळी मराठा आरक्षणाची मागणी केली त्यावेळी काँग्रेसमधील प्रस्थापितांनी या मागणीला कडाडून विरोध केला होता. ही मागणी करणारे आण्णासाहेब पाटील यांची देखील त्यांनी हत्या घडवून आणली. आताही अशोक चव्हाण यांच्या सारख्या प्रस्थापित नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच नकोय असे मनोमन वाटते. त्यामुळेच जेव्हा कोर्टात वकीलांनी भुमिका मांडायची त्यावेळी ते गैरहजर असायचे. किंवा काय भुमिका मांडायची याचं काही ब्रिफिंगच केलेलं नसायचं. त्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. अशोक चव्हाण केवळ मेटे हे भाजपचा असल्याचा प्रचार करतात. परंतु एकदाही त्यांनी मी विचारलेल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. समाजाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची त्यांची हिंमत नाही. चव्हाण कुठल्या पक्षात आहेत याला माझा विरोध नाही परंतु चव्हाण यांच्या सारख्या वृत्तीची अनेक माणसं आरक्षण लढ्यात खोडा घालत आहेत. त्यांनी जो काय विरोध करायचा तो समोरून करावा, आणि स्वतः मैदानात उतरावे, असा इशाराही आ. विनायक मेटे यांनी दिला आहे.
आरक्षण नसल्यामुळे अनेक गोरगरीबांची मुले हुशार असुनही ते योग्य संधीपासून दूर राहतात. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाल्यानंतर इडब्ल्युएसमध्ये तरी समाजाला आरक्षण द्यावे अशी याचिका मी दाखल केली. त्यानंतर सरकारला जाग आली. किमान त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागली आहे. माझ्या मोर्चाला विरोध करणार्‍या एकाने तरी सांगावे तुम्ही मराठा समाजासाठी काय केले? महाराष्ट्रात मी, छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे हे तिघेच बोलत आहोत. सभागृहातील एकही मराठा आमदार, खासदार पुढे येऊन आरक्षण प्रश्नावर का आपली भुमिका मांडत नाही, असा सवाल देखील मेटे यांनी केला आहे.
त्यामुळे समाज बांधवांनी कुठल्याही राजकीय चक्रव्युहात न अडकता आजच्या मोर्चात आपला सहभाग नोंदवावा. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी हा मोर्चा असून कोणीही यात राजकारण करू नये, असे आवाहन देखील आ.विनायक मेटे यांनी केले आहे.

आडवा-आडवी केली तर आमच्याशी गाठ
मोर्चेकर्‍यांची प्रशासनाने आडवा आडवी करू नये. आम्ही प्रशासनासोबत सहकार्याची भुमिका घेत आहोत. कोरोनामुळे मोर्चेकर्‍यांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सबाबत आम्ही खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे कोणीही मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये, कुणी जाणीपुर्वक मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम्हाला आडवं येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही आ.विनायक मेटे यांनी केले.

संकुचित मानसिकता बाजुला ठेऊन मोर्चात सहभागी व्हा – नरेंद्र पाटील
बीड- आरक्षण न मिळण्यास राज्य सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. जेव्हा जेव्हा न्यायालयात आरक्षणाच्या बाजुने भुमिका मांडायची वेळ आली त्या त्यावेळी आघाडी सरकारने भक्कमपणे बाजु मांडली नाही. आम्ही सगळ्यांना आजही विनंती करीत आहोत, तुम्ही कुणाच्याही सोबत येऊ नका. तुम्ही केवळ मराठा आरक्षणाच्या बाजुने या. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा हा लढा सुरु आहे. मराठा समाजाच्या इतरही अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या पुर्ण झाल्या तर समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे. आज आ.विनायक मेटे बीडमध्ये पुढाकार घेत आहेत. असाच राज्यभरात त्या त्या ठिकाणचे लोक पुढाकार घेऊन मोर्चे काढतील. त्यामुळे एकटे विनायक मेटे हिरो होतील ही मानसिकता बाजुला ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असेही नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाचा प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाशी जोडला गेला आहे. त्यामुळे कुणीही विनायक मेटे यांना नाव ठेऊ नये. आरक्षण मोर्चाचा प्रश्न कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडला जाऊ नये. जे कोणी आरक्षण प्रश्नावर विधायक मार्गाने आंदोलनाची भुमिका घेतील त्या त्या लोकांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

असा असेल मोर्चाचा मार्ग
मोर्चाची सुरुवात सकाळी 10ः30 वाजता श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल – शहर पोलीस स्टेशन – आण्णाभाऊ साठे चौक – छ.शिवाजी महाराज पुतळा – जिल्हाधिकारी कार्यालय अशी होणार आहे. मोर्चामध्ये मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार असून, येणार्‍या लोकांना थांबण्यासाठी जिल्हा क्रिडा संकुलावर व्यवस्था करण्यात आलेली आहे. मोर्चाचा क्रम हा सर्वप्रथम महिला व मुली त्यानंतर योग्य अंतर ठेऊन विद्यार्थी व पुरुष राहतील. मोर्चाच्या प्रत्येक रांगेत 06 जण असतील. त्याप्रमाणे मोर्चात शिस्तीत चालण्याचे अवाहन करण्यात आले आहे. कोणीही समाज बांधवांनी पुढे जाण्यासाठी घाई करु नये. शिस्तीचे पालन करावे व मोर्चासाठीची आदर्श आचार संहिता तयार करण्यात आली आहे, ती तंतोतंत पाळावी. पार्कींगची व्यवस्था दुचाकी वाहनांसाठी सिध्दीविनायक कॉम्प्लॅक्सच्या पाठीमागे करण्यात आली आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी जालना रोडच्या दोन्ही ही बाजूने करण्यात आली आहे.

Tagged