वराह चोरीच्या वादातून तरुणाचा खून!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे


अंबाजोगाई दि.31 : वराह चोरल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वादावादी झाली. त्यानंतर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान एका 32 वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राचे वार करून खून केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील वडारवाडा परिसरात घडली. तसेच या घटनेत दोघे जखमी झाले आहेत.
अंबाजोगाई शहरातील वडारवाडा परिसरात राहणारे काही लोक वराह पालनाचा व्यवसाय करतात. रवी अभिमान धोत्रे (वय 32) हा तरूण देखील वराह पालन करत होता. परंतू त्याची वराह काही तरूणांनी चोरले असल्याची माहिती रविला मिळाल्यानंतर रविने संशयीताच्या घरी जावून आमची वराह का चोरली असा जाब विचारला. यावेळी शाब्दीक बाचाबाची देखील झाली. याच बाचाबाचीचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले. रवी हा घरी आलेला असताना दुचाकीवरुन आलेल्यांनी आम्ही वराह चोरले नाही, तुम्ही आमच्या माणसांना का बोलता अशी आशयाची चर्चा झाली आणि पुन्हा शाब्दिक बाचाबाचीला सुरूवात झाली. यावेळी एका तरूणाने आपल्या हातातील धारदार शस्त्राने रवी धोत्रे याच्यावर सपासप वार केले.
दुपारच्या वेळेला पाऊस सुरू असल्या कारणाने बहुतेकजण घरातच असताना रस्त्यावर मात्र हा जीवघेणा प्रकार सुरू होता. रस्त्यावरचा हा प्रकार रवी धोत्रेंच्या नातेवाईकांना समजल्यानंतर ते देखील घराबाहेर पडले. यावेळी पुन्हा मारामारीला सुरूवात झाली. या मारामारीत धोत्रे याला मारण्यासाठी आलेल्यापैंकी दोघाजणांना मार लागला. घटनेची माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सर्व जखमींना स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय रूग्णालयामध्ये दाखल केले. परंतू रवी धोत्रे याचा मात्र या मारहाणीमध्ये धारदार शस्त्राचे वार लागून मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे आठ दिवसापूर्वीच रवी धोत्रे याला कन्यारत्न प्राप्त झाले होते. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात मात्र खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई शहरातील गेल्या सहा महिन्यांत तिसरी घटना घडली आहे.

Tagged