जिल्हाधिकार्यांनी मागविली माहिती; स्वारातीचे 23, इतर आरोग्य यंत्रणांकडून 39 कोटींचे प्रस्ताव
शुभम खाडे । बीड
दि.3 : कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गुरुवारी (दि.2) आढावा घेऊन मार्चपर्यंत आवश्यक यंत्रसामुग्री, औषधी, मनुष्यबळासह इतर बाबींसाठी लागणार्या खर्चाची माहिती मागविली होती. त्यानुसार विविध आरयंत्रणांकडूनप्रस्तावित मागणीनुसार कोरोनाची तिसरी लाट आल्यास 60 कोटींच्या निधीची आवश्यकता लागू शकते.
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर येत आहेत. अंबाजोगाईच्या स्वारातीसह राज्य आरोग्य विभागाच्या काही संस्थांतील घोटाळ्यावर चौकशीअंती शिक्कामोर्तब देखील करण्यात आले आहे. अशात कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आल्यास मार्चपर्यंत आरोग्य विभागाला लागणारा निधी देण्याच्या तयारीत जिल्हा प्रशासन आहे. लाट आल्यास मार्चपर्यंत आरोग्य यंत्रणेला आवश्यक यंत्रसामुग्री, औषधी, मनुष्यबळासह इतर बाबींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. यात अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयाकडून 23 कोटी 37 लाखांची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे. तर जिल्हा रूग्णालयासह संबंधित यंत्रणांकडून 24 कोटी 86 लाख, जिल्हा परिषद आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणांकडून 15 कोटींच्या घरात मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, प्रस्तावित मागण्यांपैकी तातडीच्या बाबींना आपत्ती विभागाकडून मंजुरी देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
निधी खर्चावरून तत्कालीन अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रेंच्या अडचणीत वाढ
अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात कोरोना काळात ऑक्सिजन पाईपलाइनच्या 28 लाख रुपयांच्या कामात मोठा प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याची तक्रार आ. नमिता मुंदडा यांनी केली होती. या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात हा संपूर्ण प्रकार कर्तव्य कसूरता, निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा असल्याचे ताशेरे ओढण्यात असून यावर पुढील उचित कार्यवाही करण्यात यावी असे पत्र विभागीय आयुक्तांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांना दिले आहे. या आदेशामुळे स्वतःच्या कथित पारदर्शक कारभाराचे आणि कर्तव्य तत्परतेचे ढोल बडवून घेणारे तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कार्यकर्त्यांनो बघा कुठं टेंडर भरता येतंय का?
कार्यकर्ते रस्ते, सभागृह यातच गुंग असतात. मात्र काहीच चाणाक्ष अशा टेंडरकडे लक्ष ठेऊन असतात. मात्र हे चाणाक्ष सगळ्या आरोग्य यंत्रणेला आणि सरकारी तिजोरीला चुना लावतात. त्यामुळे अशा टेंडर प्रक्रीयेत जास्तीत जास्त टेंडर आले तर भ्रष्टाचारास कमी संधी मिळेल. टेंडर न मिळालेला टेंडर मिळालेल्या संस्थेच्या कामावर लक्ष ठेवेल. स्पर्धा वाढल्याने दर्जा सुधारेल, असे बोलले जाते.