परळी – एसटी कर्मचार्यांच्या संपाचा तिढा काही सुटायचे नाव घेत नाही. काही कर्मचारी कामावर परतले मात्र काही अजुनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. काल परळी आगारातून बीडला बस सोडण्यात आली होती. या बसची एक फेरी ज्या चालकाने मारली होती, त्या बस चालकाने आज सकाळी परळी आगारात येऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. नागनाथ गित्ते असं त्या कर्मचार्याचं नाव आहे.
परळी आगाराचे एसटी कर्मचारी गेल्या 35 दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. परंतु, काल पहिल्यांदाच नागनाथ गित्ते हा चालक आणि वाहक मोहन गित्ते हे कामावर हजर झाल्याने एसटीच्या अधिकारी व पोलीस संरक्षणात परळी बीड बस सोडण्यात आली होती. मात्र, काल एक फेरी मारल्यानंतर आज गित्ते यांनी विष घेतल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, चालक नागनाथ गित्ते यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांनी विष का घेतलं ? हे अद्याप अस्पष्ट आहे.
संप जास्त दिवस राहील्याने मानसिक ताण
दरम्यान संप जास्त दिवस राहील्याने कर्मचार्यांवर मानसिक ताण झालेला आहे. सरकारकडून मेस्मा लावली जाण्याची भिती, कामावर आले तर इतर कर्मचार्यांकडून होणार त्रास आदींमुळे कर्मचारी विचित्र कात्रीत सापडले आहेत.