वाळूचा वाद घरापर्यंत!
गेवराई : कोणाचीही परवानगी न घेता घरात घुसून महिलांना धमकावल्या प्रकरणी गेवराईचे तहसीलदार सचिन बाळासो खाडे यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींवर गेवराई पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सचिन खाडे यांना गुरुवारी वाळू माफियांनी धमकावले व कार्यालयात जाण्यापासून रोखले होते. या घटनेनंतर तीन महिलांनी खाडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता वाळूचा वाद घरापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे.
कुसूम शिवाजी मोटे, स्वाती सोमनाथ गिरगे, सुनीता सुरेश भुंबे (सर्व रा.गेवराई) अशी फिर्यादी महिलांची नावे आहे. तिन्ही तक्रारीनुसार, तहसीलदार सचिन खाडे हे सहा ते सात जणांना सोबत घेऊन आले. गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरातील कोणत्याही व्यक्तींची परवानगी न घेता घरात प्रवेश करून महिलांना तुम्ही वाळू प्रकरणातील आरोपी लपवून ठेवले असे म्हणत धमकावले आहे. याप्रकरणी तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात जणांविरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि.संदीप काळे हे करत आहेत.
२ दिवसांपूर्वी माफियांनी तहसिलदारांना धमकावले
तहसीलदार सचिन खाडे यांना सोमनाथ गिर्गे यासह अन्य दोन वाळू माफियांनी गुरुवारी घरी जाऊन धमकावले होते. तहसिलला जाण्यापासून अडविले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा गुरुवारी दाखल झाला. या घटनेनंतर शुक्रवारी एकाच दिवशी तीन महिलांनी तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरोधात तक्रारी दिल्या. दरम्यान, या प्रकरणात वाळू माफियांचा हात असल्याची चर्चा होत आहे.