उद्योजक प्रदीप ठोंबरे उभारतायेत यश अॅग्रो डेअरी फूड पार्क प्रकल्प
बीड जिल्ह्याच्या बालाघाटाच्या डोंगररांगात पिकणार्या व रानमेवा म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जाणार्या सीताफळाची कायम परवडच झाली. ही परवड थांबून इथल्या स्थानिकांच्या हाताला काम व सीताफळाला वैभव प्राप्त करुन देण्यासाठी अंबाजोगाई येथील यश डेअरीचे मालक प्रदीप ठोंबरे हे सरसावले आहेत. इमारत आणि रस्ते बांधकामातील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘यश कन्स्ट्रक्शन’च्या ‘यशा’नंतर आता त्यांनी कृषी, उद्योग क्षेत्रातील डोळे दिपवणारं ‘यश’ प्राप्त केले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथील यश कन्स्ट्रक्शनचे मालक व प्रयोगशील शेतकरी प्रदीप ठोंबरे यांनी दगडवाडी येथे आपल्या हक्काच्या शेतात मराठवाड्यातील पहिला प्रयोगिक तत्वावरील यश अॅग्रो डेअरी फुड पार्क प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात यंदा सीताफळाचा चार टन गर काढून तो कोल्डस्टोरेज करण्यात आला आहे. या गरापासून आता चॉकलेट, कुल्फी, मिठाई आईसस्क्रीम तयार होणार आहे. प्रदीप ठोंबरेंचा हा प्रयत्न बीडच्या रानमेव्याची चव राज्यभर नव्हे तर देशभर घेऊन जाणारा ठरणार आहे. परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन यश कस्ट्रक्शनच्या माध्यमातून राज्याच्या बांधकाम क्षेत्रात एक अजोड विश्वास निर्माण करणार्या प्रदीप ठोंबरे यांचा हा नवा प्रयोग व प्रयत्न बालाघाटासह जिल्ह्याला समृद्धीकडे घेऊन जाणारा ठरणार आहे. आज शेकडो बेरोजगारांच्या हाताला काम देणारा हा प्रकल्प भविष्यात हजारोंच्या आयुष्यात अर्थक्रांती करणारा मैलाचा दगड ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नेहमीच दुष्काळाचे चटके सोसणार्या बीड जिल्ह्यातील सीताफळाला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. या जिल्ह्यात पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगात अवीट गोडीचे बालानगरी सीताफळ प्रसिद्ध आहे. म्हणूनच हैदराबाद येथील निजामाला बीड जिल्ह्यातील सीताफळाची गोडी समजल्याने निजामाने आपल्या बरोबर या मातीतले सिताफळ हैदाराबादला नेत त्याची लागवड केली होती. परंतु आजपर्यंत शासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील सीताफळ उपेक्षीत राहिले. सीताफळाचे उत्पादन होत असले तरी त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. या जिल्ह्यात सीताफळाला पोषक असे हवामान असून सीताफळाची बालानगरी जात प्रमुख्याने आढळते. या फळाला बालाघाटच्या डोंगररांगातील कमी पावसाचे वातावरण अनुकूल असते. माफक प्रमाणात पाणी लागत असल्याने पाहिजे तेवढे हे फळ मिळते. त्यामुळे त्याची गोडी अविट आहे. जिल्ह्यातील डोंगर भागात पडीक जमीन असून सीताफळाचे बी खाऊन आपोआप पडते. आणि नैसर्गिकरित्या ते वाढते. बालाघाटच्या डोंगरातील जमिनीत जी पोषक द्रव्ये आहेत ती सीताफळासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यातच रासायनिक खतांचा सबंध येत नसल्याने या मातीतील सिताफळ 100 टक्के सेंद्रिय असते. उन्हाळ्यात या पिकाला पाण्याचा ताण आवश्यक असतो, तो नैसर्गिकरित्या मिळतो. यामुळे फळाची गोडी आपोआप तयार होते. जिल्ह्यात सीताफळाची नैसर्गिकरित्या होणारी वाढ, वाढीसाठी केवळ पावसाचे पाणी, डोंगरदर्याचे वातावरण आणि वेगळी माती यामुळे बीड जिल्ह्यातील सिताफळांना वेगळी चव आणि गंध आहे. विशेष करून अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा, येल्डा, चिंचखंडी, वरवटी, चनई, सोनहिवरा, राक्षसवाडी, कुरणवाडी, धावडी त्याचबरोबर धारूर तालुक्यातील कारी, चोरांबा, भोगलवाडी, बीड तालुक्यात मांजरसुंबा, नेकनूर, कोळवाडी, माजलगाव तालुक्यातील पाथरूड, दिंद्रुड, परळी तालुक्यातील मोहा, नागापूर पट्ट्यातील मांडेखेल, बोधेगाव शिवारामध्ये सिताफळांची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. अंबाजोगाई शहरातील मराठीचे आद्यकवी मुकूंदराज स्वामी व बुट्टेनाथ परिसरात सिताफळांच्या झाडांची संख्या अधीक असून अंबाजोगाईसह, धारूर, केज, परळी या तालुक्यातील डोंगर पट्ट्यात नैसर्गिकरित्या उगवलेल्या सिताफळांच्या झाडे हे इतर ठिकाणच्या झाडांपेक्षा अगदी वेगळीच आहेत. यंदा अंबाजोगाई तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अडीचपट पाऊस झाल्याने सिताफळांच्या झाडांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळाले. त्यामुळे झाडांना लागलेली सिताफळे दोनशे ग्रॅमहुन अधिक वजनाची भरल्याने बाजारात मागणी वाढलेली होती. सिताफळाची विक्री करण्यासाठी अंबाजोगाईसह जिल्ह्यातील शेतकर्यांना एक हक्काची बाजारपेठ मिळावी. मोठ्या प्रमाणावर उत्पादीत होणार्या सिताफळावर प्रक्रिया व्हावी ही परिस्थीती ओळखून अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथील यश कन्स्ट्रक्शनच्या 170 एकराचा डोंगराळ परिसरात प्रयोगशील शेतकरी प्रदीप ठोंबरे यांनी दगडवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून आपल्या शेतीत विविध आधुनिक प्रयोग केले आहेत. 170 पैकी 60 एकरात सिताफळाच्या 33 हजार झाडांची लागवड केली आहे. त्यात 30 हजार झाडे बालानगर वानाची तर तीन हजार झाडे एनएमके जातीच्या वानाची सीताफळं आहेत. हैद्राबाद सिलेक्शन असलेल्या बालानगर नावाची सिताफळाची रोपे त्यांनी बारामतीच्या कृषी प्रतिष्ठाण केव्हीकेमधून आणली आहेत. माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील प्रतापराव ठोंबरे यांच्या ठोंबरे नर्सरीतून केशर अंब्याची 17 हजार झाडे आणून शेतात लागवड केली आहे. केवळ फळांच्या झाडांची लागवड न करता लागवड केलेल्या झाडांना पाणी मिळाले पाहिजे, त्या झाडांची चांगली वाढ झाली पाहीजे, यासाठी दगडगवाडी येथील प्रकल्पावरील सिताफळ व अंब्याच्या झाडांना अत्याधुनिक असलेल्या अॅटोमायझेशन पध्दतीने पाणी दिले जाते. पाण्याचा ईसी व पीएच पाहीला जात असल्याने झाडांना हवे तेंव्हा हवे तिथे पाणी देता येते. या अत्याधुनिक पध्दतीमुळे सेंद्रीय खतावर वाढणार्या या झाडांना एक समान पाणी मिळत असल्याने झाडांची एकसमान वाढ होत आहे. त्यांनी या प्रकल्पावर एक कंट्रोलिंग रूम तयार केली असून या कंट्रोलिंग रुमध्ये एका कर्मचार्याची नियुक्ती करत कॉम्प्युटरवर संकेतस्थळावरून झाडांना पाणी देण्याची प्रणाली हाताळता जात आहे. विशेष म्हणजे मोबाईलवर सुध्दा झाडांच्या पाण्याचे कंट्रोलींग करता येते हे विशेष आहे. येत्या मे 2022 पासून या प्रकल्पात अंबा, पेरू, स्ट्रॉबेरी अशा फळांचे पल्प काढला जाणार असून हा पल्प कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवुन त्या फळांचे पेटेंट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा फळांपासुन चॉकलेट, कुल्फी, मिठाई तयार करण्यात येणार आहे. याशिवाय गिर गायी जोपासण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. सध्या त्यांच्याकडे 50 गिर गायी आहेत. फळाबराबेरच दुध उत्पादन वाढवून दुधात धवलक्रांती करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
प्रकल्पात शेकडो बेरोजगारांच्या हाताला मिळणार काम
अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथील शेतातील दोन एकरमध्ये हा यश अॅग्रो डेअरी फुड पार्क हा फळांवर प्रक्रिया करणारा मराठवाड्यातील पहिला -वहिला प्रयोगीक तत्वावरील प्रकल्प सुरू केला असून येत्या मे 2022 पासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. अंबाजोगाईत नौकरीच्या शोधात फिरणार्या जवळपास 100 बेरोजगारांच्या हाताला या प्रकल्पात काम देण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच, आपल्या मातीत उत्पादीत होणारे सिताफळ व अंबा, पेरू ही फळे शेतकर्यांना योग्य किंमतीत प्रकल्पात विकता येणार आहेत. यंदाच्या सिताफळाच्या हंगामात या फुड पार्क प्रकल्पात स्थानिक महिला कामगाराच्या हाताला काम मिळाले. या रोजगारातून महिलांना आर्थिक सहाय्य झाले असून प्रकल्पात काम केलेल्या महिलांनी सिताफळापासून चार टन गर काढला. हा चार टन गर कोल्डस्टोरेजला साठवून ठेवण्यात आला असून या गरापासून फ्रीज डाईडची प्रकिया करण्यात आली आहे. आजपर्यंत दुर्लक्षीत राहिलेला या रानमेव्याच्या पल्पपासून चॉकलेट, कुल्फी, मिठाई आयस्क्रीम तयार होणार असल्याने बीडकरांना या पदार्थांची पहिल्यांदा चव चाखायला मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकर्यांना सिताफळ, अंबा, पेरू, चिकू अशा फळ लागवडीला प्रोत्साहन ते देणार आहोत, अशी माहिती प्रयोगशील शेतकरी प्रदिप ठोंबरे यांनी दिली आहे.
जून महिन्यात अंब्याचे उत्पादन
दगडवाडी येथील शेतात केशर अंब्याचे उत्पादन हाती घेतले जाणार असून यश अॅग्रो डेअरी फुड पार्क प्रक्रिया प्रकल्पाच्यावतीने मॅगो पल्प युनीट सुरू होणार आहे. आता अंब्याचे उत्पादन हात आहे. अंबा व सिताफळापासून आयस्क्रीम, रबडी, ज्यूस, चॉकलेट तयार होणार आहे. सदरील उत्पादनाची मार्केटींग केली जाणार आहे. त्यामुळे हा मराठवाड्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. अशी माहिती दगडवाडी येथील यश अॅग्रो डेअरी फुड पार्कच्या कार्यकारी संचालक अनिता प्रदिप ठोंबरे यांनी दिली.