विवाहानंतर दुसर्या महिन्यापासूनच त्रास; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
अंबाजोगाई दि.15 ः विवाह झाल्यानंतर दुसर्या महिन्यापासूनच मोहरहून बोलेरो पिकअप आणि सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा सतत छळ केला. हा सततचा छळ असह्य झाल्याने त्या विवाहितेने लग्नानंतर वर्षभराच्या आतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे शनिवारी (दि.13) घडली. या प्रकरणी पतीसह चौघांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मेघा निखील करवे असे मयत विवाहितेचे नाव आहे. मेघाचे वडील भरत खज्जे (रा.औसा, जि.लातूर) यांच्या फिर्यादीनुसार, तिचे लग्न गतवर्षी निखील गंगाधर करवे (रा. साळुंकवाडी, ता.अंबाजोगाई) याच्यासोबत मानपान देऊन झाले होते. सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती निखील, सासू वर्षा, सासरा गंगाधर नरहरी करवे, दिर आदित्य ऊर्फ भैय्या यांनी तुला स्वयंपाक, कामधंदा करता येत नाही म्हणून मेघाचा छळ सुरु केला. मेघाच्या आई-वडिलांनी समजूत घालूनही त्यांच्या वागण्यात फरक पडला नाही. त्यानंतर बोलेरो पिकअप आणि सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत त्या चौघांनी मेघाचा छळ सुरूच ठेवला. शनिवारी (दि.13) निखिलने मेघाच्या वडिलांना बोलावून घेतले. यावेळी मेघाने हुंड्यासाठी मारहाण होत असल्याचे वडिलांना सांगितले. पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर मेघाला यापुढे कधीच माहेरी पाठवणार नसल्याचे निखिलने सांगितल्याने तिचे वडील तिथून निघून आले. त्यानंतर रात्री 9 वाजताच्या सुमारास मेघाने घरातील लोखंडी आडूला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. सदर फिर्यादीवरून पती निखील, सासू वर्षा, सासरा गंगाधर नरहरी करवे, दिर आदित्य गंगाधर करवे या चौघांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.