चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू!

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे परळी

परळी शहर ठाण्यातील घटना ; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

परळी दि.14 : परळी शहर पोलीस ठाण्यात अंदाजे दहा वर्षाखाली एका आरोपीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपींना अटकही झाली. ही घटना ताजी असतानाच मंगळवार (दि.13) रोजी चोरीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा चौकशी दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतलेले असताना झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

जरीन शेख पाटेवाले (वय 48) असे मयताचे नावं आहे.चौकशी दरम्यान केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकानी रात्रभर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातच ठिय्या केला. दरम्यान कोणत्या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतले याबाबत माहिती भेटू शकलेली नाही. आरोपीच्या मृत्यूची चौकशी केली जावी अशी मागणी नातेवाईकानी केली आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परळी शहर पोलिस ठाण्यात आरोपी व त्याच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान केल्या मारहाणी मुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा समीर खान याने केला आहे. एका आरोपीचा शहर पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याचे प्रकरण सुरू असतानाच आणखी किती आरोपीचे मृत्यू शहर पोलीस ठाण्यात होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. मयताचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे. तसेच परळीत सीआयडी दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परळीत एकच खळबळ उडाली आहे.

Tagged