जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

धारूर न्यूज ऑफ द डे बीड

शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी

किल्ले धारूर /सचिन थोरात
धारूर तालुक्यातील गावंदरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. परंतु या शाळेत 13 शिक्षकांची संख्या असताना या शाळेचा कारभार ८ ते ९ शिक्षकावर चालवला जातो. रिक्त पदामुळे या ठिकाणी ज्ञानार्जनास शिक्षकांना अडचणी येतात. यासाठी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत दीड महिन्यापूर्वी शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवार रोजी संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकत रिक्त पदांचे ग्रहण सोडवण्याची मागणी केली आहे.

तालुक्यात गावंदरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एक आदर्श आणि मॉडेल शाळा म्हणून नावारूपास आलेली आहे. याठिकाणी 250 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे. शाळेत प्राथमिक पदवीधर ची चार पदे मंजूर असून गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणची प्राथमिक पदवीधरची तीन पदे रिक्त आहेत तर एकच शिक्षक कार्यरत होते. त्याही प्राथमिक पदवीधर शिक्षकाची नुक्तीच बदली झालेली आहे. सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकवायला एकही शिक्षक सध्या शाळेवर कार्यरत नाही. सदरील शाळा ही आदर्श शाळा असूनही चारही प्राथमिक पदवीधरांचे पदे रिक्त असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचे टीसी घेऊन पालक इतरत्र खाजगी संस्थेकडे जात आहेत. गावकऱ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आदर्श शाळा म्हणून नावारूपास आणलेली ही शाळा शिक्षण विभागाच्या या रिक्त पदे न भरण्याच्या धोरणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. सतत मागणी करून ही रिक्त पदे भरली जात नसल्याने येथील ग्रामस्थांनी शुक्रवार रोजी शाळेला कुलूप ठोकत शाळेसमोरच आंदोलन करत रिक्त पदांचे ग्रहण सोडवण्याची मागणी केली आहे.

आमच्या गावची शाळा ही तालुक्यात आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. परंतु या शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसतील तर तालुक्यात आदर्श असणारी शाळा मोडकळीस येण्यास वेळ लागणार नाही. सतत मागणी करूनही शिक्षण विभाग दखल घेत नसल्याने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकारास शिक्षण विभाग जबाबदार आहे.
-बिभीषण बडे, उपसरपंच, ग्रामपंचायत, गावंदरा

Tagged