बोगस बियाणे पुरवठा करण्यार्या तीन कंपन्यांना दणका
बीड, दि.4 : बोगस बियाणांचा पुरवठा करून शेतकर्यांच्या आयुष्याशी खेळणार्या तीन कंपन्यांवर बीड आणि परळीमध्ये गुन्हे नोंद झाले आहेत. कृषी विभागाच्यावतीने या फिर्यादी देण्यात आल्या आहेत.
खरीप हंगामातील सोयाबीनचे क्षेत्र जवळपास 1 लाख 90 हजार हेक्टर एवढे आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांनी सोयाबीनच्या पेरणीस सुरुवात केली होती. दरम्यान, जिल्हाभरातून 3 हजार शेतकर्यांनी सोयाबीन न उगवल्याची तक्रारी केल्या होत्या. दरम्यान शेतकर्यांचे मोठे नुकसान यामुळे झाले होते. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकर्यांमधून तात्काळ मदतीची मागणी होत आहे. कृषी विभागाच्या वतीने सर्व तक्रारीची शेतात जाऊन पाहणी करून पंचनामा केला. त्यानुसार बीड तालुक्यातल तक्रारींचे पंचनामे करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, पंचायतसमितीचे कृषी अधिकारी भुंजक खेडकर व त्यांचे सहकारी यांनी शनिवार-रविवारची सुट्टीच्या दिवशी देखील पाहणी करून पंचनामे केले. त्यावरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा खेडकर यांच्या फिर्यादीवरून मे. जानकी सिड्स अन्ड रसिर्च प्रा.लि. (पातुररोड म्हैसपूर जि.आकोला) चे अनिल रमेश धुमाळ व यशोदा हायब्रीड सिड्स (हिंगणघाट जि. वर्धा)चे प्रदीप माणिकराव पाटील या दोन कंपनी व संबंधित व्यक्तिंविरोधात फसवणूक व बियाणे कायदा या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेप्रमुख सोपनि.गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
तर परळी तालुक्यातील बोगस बियाणे प्रकरणी सर्वाधीक 1075 शेतकर्यांनी तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणी पंचनामा केल्यानंतर आलेल्या निष्कर्षातून तालुका कृषी अधिकारी अशोक अंबादास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ग्रीन गोल्ड सिड्स प्रा. (नारायणपूर शिवार औरंगाबाद) व कंपनीचे झोनल मॅनेजर संदीप मचिद्र बवसकरवर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.