beed-lockdown

बीड जिल्ह्यात आता लॉकडाऊनची खरी गरज

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिवन आवश्यक की जिवनावश्यक?

बीड, दि. 22 : बीड जिल्ह्यात मागील 22 दिवसात कोरोना रुग्णांची वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता आता खर्‍या अर्थाने लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे. लॉकडाऊन करण्यास छोटे व्यापारी, व्यवसायिक यांचा विरोध असला तरी कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडे दुसरा उपाय देखील नाही. लॉकडाऊनने कोरोना थांबणार नाही परंतु त्याची वेगात होणारी वाढ आटोक्यात आणता येईल. आणि हे आताच करावं लागेल. एकदा का रुग्णसंख्या हाताबाहेर गेली तर प्रशासन कशालाच पुरणार नाही ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात 22 जुलै रोजी दुपारी 2 पर्यंत 425 रुग्णसंख्या झाली आहे. 182 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
      मागील तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दररोजच्या आकडेवारीने 50 चा पल्ला गाठला आहे. सुरुवातीला औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात हीच परिस्थिती होती. आता बघता बघता तेथील दररोजचे आकडे 350 च्या घरात जाऊन पोहोचले आहेत. त्यानंतर तेथील प्रशासनाने लॉकडाऊन केला मात्र त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. कारण ज्यावेळी लॉकडाऊन करायला हवा होता त्यावेळी त्यांनी मोकळीक दिली. औरंगाबाद, नाशिककरांना किमान आरोग्याच्या सुविधा आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची तिथे क्षमता आहे. तेथील लोकांचा आर्थिक स्तर देखील उंच आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर ते चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात. परंतु आपल्या बीड जिल्ह्यात सध्यातरी एकही खासगी हॉस्पिटल कोरोनावरील रुग्णावर उपचार करीत नाहीत. सरकारी हॉस्पिटलची क्षमता, तेथील सोई-सुविधा या 22 दिवसात उघड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे हातावर पोटे असलेले असोत की व्यवसायिक, मॉलवाले असोत की शोरूमवाले या सगळ्यांना एका गोष्टीची जाणीव असायला हवी की आपल्यातील एकाला जरी कोरोना झाला तर प्रशासन अख्खा एरिया कंटेन्मेट झोन घोषित करते. मग ना व्यवसाय, ना गल्ली, ना शोरूम. 14 दिवस फक्त घरातच बसावं लागतंय. सध्याही जिल्ह्यात 78 कंटेन्मेट झोन आहेत. आज रात्रीतून ही संख्या वाढणार आहे. असे एक एक एरिये बंद करण्यापेक्षा संपूर्ण 14 दिवस कडेकोट लॉकडाऊन करायला हवे.

पिकविम्यासाठी सवलत द्या
शेतकर्‍यांचा पीक विमा भरण्यासाठी सध्या सवलत मिळावी. आपले सरकार सेवा केंद्र चालकांना प्रत्येक गाव नेमून द्यावे. तलाठ्यांनी आपआपल्या सज्जात थांबून शेतकर्‍यांना कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून शहरात गर्दी होणार नाही. प्रशासकीय यंत्रणेतील लोकांनी सहकार्यासाठी एक पाऊल पुढे टाकले तर नागरिक सहाकार्याचे दहा पाऊल पुढे टाकतात.

जिवन आवश्यक की जिवनावश्यक?
कोंबडी आधी की अंड? या प्रश्नासारखाच जिवन आवश्यक की जिवनावश्यक? हा प्रश्न आहे. पण कुठल्या वेळी काय आवश्यक हे जिल्हाधिकार्‍यांना ठरवावं लागेल. रुग्ण वाढतात त्यावेळी जिवनाला आणि रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागताच जिवनावश्यक गोष्टींना प्राधान्य द्यावे. एक शहर, एक गाव, एखादी गल्ली बंद करून कोरोना आटोक्यात येणार नाही. तसा तो लॉकडाऊननेही संपणार नाही पण किमान आटोक्यात ठेवत येऊ शकतो.

लोकांना वेळ देऊन लॉकडाऊन करावा
बीड जिल्ह्यात लॉकडाऊन करायचाच असेल तर लोकांना वेळ देऊन लॉकडाऊन करावा लागेल. किमान 2 दिवस आधी त्याची पुर्वकल्पना जिल्ह्याला हवी. एका रात्रीतून लॉकडाऊन करण्याने जनतेत संताप आहे. पुर्वकल्पना दिल्यास हा संताप टाळता येईल.

पुर्णपणे लॉकडाऊन असायला हवे
हे सुरु अन् ते बंद असे न करता जिल्ह्यातील शहराच्या ठिकाणी पूर्णपणे लॉकडाऊन करायला हवे. मेडिकल वगळता एकाही व्यवसायाला परवानगी नको. ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्रांना यातून पीक विम्याचा भरणा करण्यासाठी वगळायला हवे.

असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै -03
2 जुलै – 04
3 जुलै – 02
4 जुलै – 09
5 जुलै – 06
6 जुलै – 03
7 जुलै – 13
8 जुलै – 17
9 जुलै – 06
10 जुलै – 00
11 जुलै – 20
12 जुलै – 09
13 जुलै – 04
14 जुलै – 05
16 जुलै – 15
17 जुलै – 25
18 जुलै – 11
19 जुलै – 14
20 जुलै – 24 (सकाळी 9:45)
20 जुलै – 26 (रात्री 11ः00)
21 जुलै – निरंक
22 जुलै – 44 (रात्री 1:00)

Tagged