lal pari gevrai bus stand

लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा सुरु

कोरोना अपडेट गेवराई न्यूज ऑफ द डे

गेवराई आगारातून बीड, औरंगाबाद, पैठण आगाराच्या बसेस धावल्या

गेवराई, दि.20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरुवार पासून सुरु झाली. सर्वसामान्यांची लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा रस्त्यावर धावल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेवराई आगारातून पहिल्या दिवशी बससेवेला प्रवाशांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला. परंतू हळूहळू प्रवाशी संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेवराई आगारातून गुरुवारी गेवराई-बीड तिन फेर्‍या, गेवराई -शेवगांव एक फेरी सह आदि फेर्‍या झाल्या असून बीड, औरंगाबाद, पैठण आगाराच्या बसेस धावल्या आहेत. राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवास करण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर गुरुवारी सकाळपासून एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली. तब्बल पाच महिन्यानंतर एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी मोठे समाधान व्यक्त केले. एसटीच्या चालक वाहकांनीही एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.
विशेष म्हणजे प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची गरज लागणार नाही असे सुद्धा सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. तर गेवराई आगारच्या बस स्थानकातून पहिली फेरी बीड येथे तर आंतरजिल्हा बस सकाळी गेवराई ते शेवगाव ही बस सोडण्यात आली. तब्बल पाच महिन्यानंतर एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेवराई बसस्थानकावरुन बीड, औरंगाबाद, पैठण आगाराच्या बसेस धावल्या असून गुरुवारी पहिला दिवस होता. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता पण उद्या त्यात नक्कीच वाढ होईल. तसेच आगारातून जाणारी प्रत्येक बस ही सॅनिटाईज केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी बस मधूनच प्रवास करावा”. श्रीनिवास वागदरीकर, आगारप्रमुख गेवराई

Tagged