jayakwadi kalava

नाथसागर 96 टक्के भरले; पण तरीही पाण्याचा विसर्ग नाही

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण, दि.3 : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये कुठल्याही वेळेत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 14 गावांना स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र 96 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरही पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचा समन्वय नसल्यामुळे अखेर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नव्हता. परंतु दुपारी उजव्या कालव्यामधून 200 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरीत पाण्याचा विसर्ग न करून अधिकारी मोठी रिस्क घेत असून त्यातून अचानक मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, अशा प्रतिक्रीया गोदाकाठच्या नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.


पैठण येथील नाथसागर धरणामध्ये 85 टक्के जलसाठा निर्माण झाल्यास वरील धरणातून पाण्याची आवक लक्षात घेऊन गोदावरी नदीमध्ये लवकरच पाण्याची विसर्ग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रभारी अधीक्षक राजेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दोन वेळेस मॅरेथॉन बैठक घेण्यात आल्या. या बैठकीमध्ये तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 14 गावांना तलाठी यांच्यामार्फत सावधानतेचा इशारा दिला होता. त्यामुळे गोदावरी नदी लगत असलेल्या वडवाळी, आपेगाव, नवगाव, हिरडपुरी, टाकळी, अंबड इत्यादी गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने इशारा दिल्यामुळे सावधानी घेतली होती. काही गावातील नागरिकांनी सोशल मीडियावर मागील वर्षाची धरणातून पाणी सोडण्याचा व्हिडिओ ग्रुपवर टाकून दिवसभर अफवांचा बाजार मांडला होता. नाथसागरमध्ये गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 5856 क्युसेक आवक नोंद करण्यात आली असून वरील धरणातून पाण्याची आवक थांबल्यास गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग कुठल्याही परिस्थितीत परिस्थितीत होणार नाही, असे मत धरण परिसरातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व संबंधित अधिकार्‍यांनी नाथसागरातून पाणी सोडण्यासाठी दोन वेळेस घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये हवामान खात्याचा अंदाज न घेता पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन कुठल्या आधारावर केले होते असा सवाल 14 गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Tagged