बँक मॅनेजरचे पाय धुवून, हळद-कुंकू, फूले वाहून आ.धसांनी केली गांधीगीरी

देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड

बीड : भाजपचे आमदार सुरेश धस नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांनी केलेली गांधीगीरी चर्चेचा विषय झाली आहे. शेतकर्‍यांच्या पीक विम्याचं कर्ज बँकेकडून मंजूर केलं जात नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे हे कर्ज तात्काळ मंजूर व्हावं म्हणून त्यांनी चक्क बँक मॅनेजरचे पाय धुवून त्याला हळदी-कुंकू आणि फुले वाहून त्याच्या पायाही पडले. धस यांच्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनामुळे बँक पीककर्जाच्या फाईली मंजुर करते का नाही ते पहावं लागेल.

बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पिके बाजारात जाण्याची वेळ आली तरी बँकांनी अद्याप शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप केले नाही. बँकांच्या मनमानी कारभारामुळे आणि सरकारच्या अनास्थेमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण गावात देखील पीककर्ज वाटपाचा पुरता फज्जा उडालेला आहे. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकांना वारंवार भेटून विनंती करून देखील पीककर्ज वाटप यंत्रणेत काहीच बदल होत नव्हता. बँकेच्या शाखेमध्ये बारा गावातील शेतकर्‍यांची सतराशे पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी खेटे मारून दमले पण मंजुरी मिळत नव्हती. शेवटी काल गांधीगिरीचा मार्ग अवलंबत बँक शाखा व्यवस्थापकांचे पाय धुवून, फुले वाहून आहेर करत शेतकर्‍यांची पीक कर्ज मंजूर करण्याची विनंती केली, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

सुरेश धस यांनी बँक मॅनेजरला त्यांच्या घरी बोलावले. या मॅनेजरला खुर्चीत बसवून त्यांना पाटावर पाय ठेवायला लावले. त्यानंतर पाण्याने त्यांचे पाय धुतले. टिश्यू पेपरने बँक मॅनेजरचे पाय पुसल्यानंतर त्यांच्या डोक्यावर फुले टाकून त्यांच्या पायावरही फुले ठेवली. त्यांच्या पायाही पडले. त्यानंतर धस यांनी लॉकडाऊनमुळे शेतकरी खायला मोताद झाला आहे. त्यांचं पीक कर्ज मंजूर करा. या शेतकर्‍यांना हवालदिल करून आत्महत्येस प्रवृत्त करू नका, अशी विनंती बँक मॅनेजरला केली. बँकेत शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे 9 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील फक्त 50 फायली मंजूर झाल्या आहेत. बँकेकडून अत्यंत संथगतीने कारभार सुरू असल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप असून या शेतकर्‍यांनी धस यांच्याकडे गार्‍हाणी केली होती. त्यामुळे धस यांनी ही बँकेत खेटा मारूनही कर्ज मंजुरी होत नव्हती. अखेर त्यांनी हा गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. सध्या बीडमध्ये धस यांच्या या गांधीगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Tagged