धारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा

धारूर न्यूज ऑफ द डे

सचिन थोरात/धारूर
दि.23 : मागील काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. यामुळे बालाघाट पर्वतरांगा असलेला धारुरचा डोंगरमाथा वेगवेगळ्या फळे-फुलांनी बहरून गेला आहे. यामध्ये सीताफळ, धामणी आणि कार-बोर ही स्वादिष्ट आणि दुर्मिळ लहान-मोठ्या प्रकारातील फळ डोंगरमाथ्यावर सहज उपलब्ध होत आहेत. याच परिसरातील नागरिक याचा आस्वाद घेण्यासाठी डोंगरदर्‍यात भ्रमंती करताना दिसून येत आहेत.

डोंगररांगा ही धारूर तालुक्याला लाभलेली मोठी पर्वणीच. या परिसरातील डोंगर माथ्यावर वेगवेगळी फळे, फुले या दिवसात बहरून जातात. परंतू मागील चार-पाच वर्षात सातत्याने पडणारा दुष्काळ यामुळे परिचयाची असणारी रानफुले-फळे दुर्मिळ झाली होती. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून धारूर तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने डोंगरमाथ्यावर वेगवेगळ्या प्रकारचा दुर्मिळ रानमेवा सहज उपलब्ध झाला आहे. यामध्ये धामणी, कार-बोर ही रानमेवा प्रकारातील छोटी-छोटी फळे आज बहरून आली आहेत. तर पुढील पंधरा दिवसानंतर याच डोंगर माथ्यावर असलेल सीताफळ सहजरित्या रस्त्याच्या कडेला सिताफळ विक्रेत्यांकडून उपलब्ध होणार आहे. या रानमेव्यामधील कार नावाचा प्रकार असलेले छोटे फळ त्यावर पिवळा रंग होताच खाण्यायोग्य होते. पिवळा रंग आलेलं हे फळ चाखत असताना चवीला तुरटपणा जाणवतो तर पूर्ण पिकलेले हेच फळ खाताना स्वादिष्ट आणि रुचकर लागते. शहरातील नागरिकांची पावले आपसूकच डोंगरमाथ्यावर वळू लागली आहेत. विशेषतः सायंकाळी आंबाचोंडी परिसरात फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना हा रानमेवा जाधववाडी धबधब्यापासून जाताना सहज उपलब्ध होत असल्याने सायंकाळनंतर डोंगरमाथा ते दरी पायथा शहरातील नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. सध्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेला बालाघाट पर्वतरांगा आणि त्यावर मिळणारा स्वादिष्ट दुर्मिळ असा रानमेवा उपलब्ध झाल्याने शहरातील आणि परिसरातील नागरिक पर्यटक म्हणून डोंगरदर्‍यांमध्ये भ्रमंती करत आहेत.

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला धारूरचा परिसर हा डोंगरदर्‍या, आंबाचोंडी देवस्थान, जाधव वाडीतील धबधबा आणि ऐतिहासिक किल्ला यामुळे पर्यटनाचे एक केंद्रस्थान म्हणून नावारूपास येत आहे. याठिकाणी माजलगाव, अंबाजोगाई, केजसह इतर भागातील पर्यटकही येऊन भेट देत आहेत.

ऑक्टोबर महिना संपेपर्यंत या डोंगर माथ्यावरील धारुरचे प्रसिद्ध असे सिताफळ उपलब्ध होणार आहे. चालू वर्षी झालेल्या सुरुवातीपासूनच्या दमदार पावसामुळे झाडांना सिताफळ चांगल्यापैकी बहरल्याने सिताफळ उत्पादनातून यावर्षी तालुक्यात मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते.

Tagged