corona virus

कोरोना आकडा शुन्यावर येण्याची जिल्ह्याला प्रतिक्षा

बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शुन्यावर येण्याची जिल्हावासियांना प्रतीक्षा आहे. लॉकडाऊन 1 ते 3 पर्यंत जिल्ह्यात उपचार घेणारा एकही रुग्ण नव्हता. परंतु राज्य शासनाने नागरिकांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देताच अवघ्या 18 दिवसात कोरोनाग्रस्ताची संख्या 62 वर जाऊन पोहोचली. आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे 52 कोरोनाग्रस्त उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर आज आणखी चार जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 6 वर येऊ शकते. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील 2, पाटोदा तालुक्यातील 2, गेवराई तालुक्यातील 1, धारूर तालुक्यातील 4, आणि परळी तालुक्यातील 1 अशाप्रकारे 10 रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. यात अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये 1 तर बीड जिल्हा रुग्णालयात 2 रुग्ण हे अतिजोखमीचे रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या 4 रुग्णांना आज सुटी देण्यात येणार असल्याचेही डॉ.थोरात यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. त्यानुसार आजच्या कोरोनो रिपोर्टमध्ये एकही पॉझिटीव्ह रुग्ण न आढळून आल्यास जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या केवळ 6 असणार आहे. 

जिल्ह्यात एकूण 62 जणांची कोरोना पॉझिटीव्ह म्हणून नोंद झाली होती. जिल्ह्यातील पहिला रुग्ण हा आष्टी तालुक्यातील पिंपळगाव येथे सापडला होता. त्याच्यावर नगर जिल्ह्यात उपचार करण्यात आले होते.

कॉन्टॅक्ट ट्रेस महत्वाचा
जिह्यात एखादा कोरोनाग्रस्त आढळून आल्यास आरोग्य यंत्रणेसमोर त्या रुग्णाचा कॉन्टॅक्ट ट्रेस करणे सर्वात महत्वाचे आव्हान असते. कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आतापर्यंत आरोग्य यंत्रणेला यश आलेले आहे. त्यामुळे बीड जिल्हा समुह संसर्गापासून वाचलेला आहे. जे बाधीत आढळले त्यातील सर्वजण मुंबई, ठाणे परिसरातून बीडमध्ये आलेले होते. केवळ परळीत बाधीत आढळलेली आणि सध्या औरंगाबादेत उपचार घेत असलेल्या महिलेला कसलीही प्रवास हिस्ट्री नसताना कोरोना कसा झाला याचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. 
आता बीड जिल्ह्याला केवळ माजलगाव आणि परळीत आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या स्वॅब रिपोर्ट काय येतो याची प्रतिक्षा आहे.

Tagged