ANGANWADI

विहिरीत बुडणार्‍या मुलाला दिले अंगणवाडी ताईने जिवदान

केज न्यूज ऑफ द डे

केज, दि. 5 : स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरीत बुडणार्‍या 15 वर्षीय विद्यार्थ्याला अंगणवाडी कार्यकर्तीने वाचविले. ही घटना 3 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील कोरेगाव शिवारातील उंबराचा माळ येथे घडली.

वैभव बळीराम लांब हा विद्यार्थी या शेतातील विहिरीजवळ मोठ्याने ओरडून मदतीसाठी आरडा ओरडा करीत होता. हा आवाज ऐकून विहिरीपासून काही अंतरावर गव्हाची कापणी करणार्‍या अंगणवाडी कार्यकर्ती उर्मिला लक्ष्मण शिनगारे यांनी त्या विहिरीकडे धावत घेतली. आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता थेट विहीरीत उडी घेऊन बुडणार्‍या मुलाला वाचविले.
शेतात काम करीत असलेल्या इतर महिलाही विहिरी भोवती जमा झाल्या होत्या. विहिरीतील दृश्य पाहून त्या घाबरल्या होत्या. तसेच विहिरीत उतरण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती. हे पाहून उर्मिला शिनगारे यांनी चार ते साडेचार परस पाणी आसलेल्या विहिरीत उडी घेऊन वैभव बळीराम लांब या पंधरा वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले.

उर्मिला शिनगारे यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान
कोरेगाव येथील अंगणवाडी कार्यकर्ती उर्मिला शिनगारे यांनी जीव धोक्यात घालून एका बालकाचे प्राण वाचविण्याची केलेली कामगिरी ही अतिशय मोलाची असून त्यांनी केलेल्या या धाडशी कामाचा आम्हाला अभिमान आहे. याची वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घ्यायला हवी, अशी माहिती महीला व बाल विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा लटपटे, यांनी कार्यारंभशी बोलताना दिली.

ज्यावेळी मी निखीलचा आवाज ऐकून विहिरीकडे पळत गेले आणि पाहिले तर वैभव बुडत असल्याचे दिसले. तेव्हा मी मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी मारली आणि कदाचित तो माझाच मुलगा आहे; या भावनेने मी त्याला वाचविले. तसेच मला पोहता येत होते. त्यामुळेच मी त्याचा जीव वाचवू शकले.
उर्मिला शिनगारे, अंगणवाडी कार्यकर्ती, कोरेगाव

Tagged