तेलगावमध्ये ट्रामा केअर सेंटरला जिल्हाधिकार्‍यांसह सीईओंची भेट

कोरोना अपडेट धारूर न्यूज ऑफ द डे

कोरोना सेंटर सुरु करण्यास मुहूर्त सापडेना

धारूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तेलगाव (ता.धारूर) येथील ट्रामा केअर सेंटरला अर्थात नियोजित कोरोना केअर सेंटरला जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह अधिकार्‍यांनी आज (दि.4) भेट देऊन पाहणी केली.

कोरोना केअर सेंटर सुरु करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्वकाही यंत्रणा सज्ज करून वर्ष लोटले आहे. तरीही हे सेंटर कार्यान्वित करण्यास जिल्हा प्रशासनाला मुहूर्त सापडत नाही का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. याठिकाणी सुसज्ज अशा ईमारतीत बेड्स, ऑक्सिजन पुरवठा व्यवस्था व रूग्णालयाच्या अनुषंगाने सर्वकाही सुविधा वर्षभरापूर्वी केलेल्या आहेत. परंतू, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बेड्स तुटवडा पडत असताना नवे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यास परवानगी देणारे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गीते हे तेलगावचे नियोजित कोरोना केअर सेंटर कार्यान्वित का करत नाहीत? श्रेयासाठी कोणाचा राजकीय दबाब आहे का? अशा अनेक शंका-कुशंका आता उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी जगताप यांनी तात्काळ हे सेंटर कार्यान्वित करून रूग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आणखी कोणी भेटी देणार का?
तेलगाव (ता.धारूर) येथील ट्रामा केअर सेंटरला अर्थात नियोजित कोरोना केअर सेंटरला पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, माजलगाव, वडवणीच्या तहसीलदार, आरोग्य अधिकार्‍यांसह पोलीस अधिकार्‍यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे. सर्वकाही सुस्थितीत असताना जिल्हा प्रशासन सेंटर कार्यान्वित करण्याचा मुहूर्त शोधणार की आणखी कोणी भेटी देणार आहे का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Tagged