mansoon

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्र

मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सहा राज्यात 9 ते 11 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून उशीरा दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, अगदी नियोजित वेळेला म्हणजे 1 जूनला ते केरळमध्ये दाखल झाले होते. तमिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागापर्यंत ते सहज पोहोचले होते. आता आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार तळकोकण मार्गे 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होईल. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यात 102 टक्के पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मान्सून पूर्वी सरीमुळे मुंबईकरांना गरमीतून विसावा मिळाला आहे. आता 11 जून रोजी मुंबईत वरूणराजा दाखल होणार आहे. सोमवारी सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून, अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सर्वत्र गारवा पसरला आहे. चक्रीवादळानंतर विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा मुंबईत हजेरी लावल्यानं तापमानातही घट झाली आहे. आता मुंबईकरांना मान्सून प्रतिक्षा असून हवमाना विभागाच्या अंदाजानुसार मान्सून दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मोसमी वारे सध्या गोव्याजवळ कर्नाटकातील कारवारपर्यंत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये दक्षिण मध्य कर्नाटकाचा काही भाग, तमिळनाडूचा बराचसा भाग आणि मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातील सर्व भागात मोसमी वार्‍यांनी प्रगती केली आहे. पोषक वातावरणामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तळकोकणातून मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गोवा, कर्नाटकातील काही भाग, तमिळनाडूतील उर्वरित भाग, आंध्र प्रदेश, मध्य अरबी समुद्रातील बहुतांश भागात मोसमी वारे दाखल होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Tagged