crime

दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड


एमपीडीए अंतर्गत कारवाईचा दणका
बीड
दि.27 : वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या आदेशाने महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत सिरसाळा व शिवाजीनगर पोलीस ठाणेहद्दीतील दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आणखी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित असल्याचेही पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या सुचनेवरुन तलवाडा, सिरसाळा पोलीसांनी गोरख सदाशिव काळे (रा.राजापुर ता. गेवराई) व आसेफ गफार बागवान (रा.सिरसाळा ता.परळी) याचे विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी, बीड यांना सादर केला होता. गोरख सदाशिव काळे याचे विरुध्द पोलीस ठाणे तलवडा व शिवाजीनगर बीड येथे दंगा करणे, जबरी चोरी करणे, गौण खनिज, वाळू चोरी, दुखापत करणे, चोरी करणे अशा गंभीर स्वरूपाच्या 9 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. तसेच स्थानबद्ध आसेफ गफार बागवान याच्याविरुध्द पोलीस ठाणे सिरसाळा व बीड शहर येथे खुनाचा प्रयत्न करणे, रस्ता अडविणे, नुकसान करणे, अवैधशस्त्र बाळगणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरुपाचे 5 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारीत केले. त्यावरून तलवडा व सिरसाळा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर इसमास 27 रोजी ताब्यात घेवून पोलीस बंदोबस्तात हर्सुल कारागृह, औरंगाबाद येथे स्थानबध्द केले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदशनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड व पोलीस ठाणे तलवडा व सिरसाळा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए
कायद्यांतर्गत होणार कारवाई

भविष्यातही हातभट्टीची दारू तयार करणारे, विक्री करणारे, वाळूचा चोर, जिवनावश्यक वस्तूचा काळा बाजार करणारे, सराईत गुन्हेगार अशा जास्तीत जास्त व्यक्तीवर व कायद्याला न जुमानणार्‍या गुन्हेगारांवर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

Tagged