मांजरीला वाटते दूध पिताना मला कोणी बघत नाही, पण लोखंडे साहेब या भ्रमातून बाहेर या
– नोंदीसाठी एकरी 5 हजारांना खिसा कापला जातो
– गेटकेन ऊसासाठी एकरी 10 हजाराची लुटमारी
बालाजी मारगुडे । बीड
दि.11 : ऊसाची नोंद खालीवर केल्याचे अनेक आरोप एनएसएल शुगरवर शेतकरी करतात. मात्र शेतकर्यांंच्या आवाजापुढे अधिकार्यांच्या मग्रुरीचा आवाज जास्त असल्याने आणि कारखाना आपला ऊस घेऊन जाणार नाही या भितीने शेतकरी अगदीच शांत राहतात. परंतु काल-परवा एका शेतकी अधिकार्याला पडलेल्या झापडीने (भलेही प्रकार खरा असो किंवा खोटा) एम.डी. गिरीश लोखंडे यांनाच भोवळ आली. त्यांनी थेट कारखानाच बंद करण्याची धमकी ऊस उत्पादक शेतकर्यांना दिली. त्यांच्या या धमकीला पाठींबा(?) देण्यासाठी माजलगावातील नेत्यांनी साखरेला मुंग्या लागाव्यात तशी भली मोठी रांग लावली आहे. मात्र हेच तथाकथित नेते शेतकर्यांची दिवसा ढवळ्या होणारी लूट, त्यांचा एकरी पाच हजार रुपयांना मारला जाणारा खिसा, तोडणीवेळी एकरी होणारी 10 हजार रुपयांची लूटमारी उघड्या डोळ्यांनी कशी काय पाहू शकतात? असा सवाल ऊस उत्पादक शेतकरी विचारत आहेत.
कारखान्याचे एम.डी. गिरीश लोखंडे यांनी कारखान्यात जो काही उच्छाद मांडला आहे त्याचे अनेक लाभार्थी गेल्या दोन दिवसात माजलगावची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आज एनएसएल शुगरच्या बाबतीत कितीतरी शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. काही शेतकर्यांनी फोनद्वारे या तक्रारी ‘कार्यारंभ’कडे मांडल्या, काहींनी व्हॉटसअप तर काहींनी प्रत्यक्ष दैनिक कार्यारंभचे ऑफिस गाठून आपली कैफीयत नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. एक शेतकरी सांगत होता, एनएसएल शुगरच्या एका अधिकार्याने 17 एकरची नोंद घेण्यासाठी 17 हजार रुपये घेतले. परंतु जेव्हा नोंद बघीतली त्यावेळी नोंद देखील करण्यात आली नाही. संबंधीत शेतकर्याने त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर या अधिकार्याने या शेतकर्याच्या अंगावर एका दलीत बांधवाला घालून थेट अॅट्रॉसिटी करण्याची तयारी केली. एका शेतकर्याने स्लिप घेतेवेळी कारखान्याच्या कर्मचार्याने 5 हजार रुपये घेतले. प्रत्येक स्लिपवेळी हे कर्मचारी पैसे मागत असल्याचे हा शेतकरी पोटतिडकीने सांगत होता. पाथरीच्या एका शेतकर्याने कसलीही नोंद केलेली नसताना अगदी 9 महिन्याचा ऊस गाळपाला आणला. पण त्यासाठी एका अधिकार्याने एका कर्मचार्याचे वाहन पाथरीच्या शेतकर्याला देत त्याच्याकडून एकरी 10 हजार रुपये घेतले. शिवाय टोळीप्रमुखाला एकरी पाच हजार रुपये दिल्यानंतर 15 दिवसात माझा 10 एकर ऊस तोडून घेऊन गेले. अशा प्रकारे मला दिडलाख रूपये खर्च आला. मात्र ही आपली गरज असल्याने कुठे काही बोलता येत नाही. परंतु पैसे खाणार्या या अधिकार्यांना आमचा पैसा पचणार नाही असा अंतःकरणातून त्याने शिव्या श्राप घातला. कारखान्यात काम करणार्या कर्मचार्यांचा 265 जातीचा ऊस देखील 9 महिन्यात गाळप केला जातो, असाही शेतकर्यांचा आरोप आहे. शेतकर्यांचे सगळे आरोप एम.डी. गिरीश लोखंडे नाकारू शकतात का? किंवा गिरीश लोखंडें यांच्या भुमिकेला पाठींबा द्यायला गेलेले माजलगावचे पुढारी शेतकर्यांचे हे आरोप खोडून काढू शकतात का? नसतील तर मग कुठल्या स्वार्थापायी आपल्याला पाठींब्याची अवदसा सुचली आहे असा सवाल ऊस उत्पादक शेतकरी विचारत आहेत.
एका-एका कर्मचार्यांची वार्षिक कमाई 10 ते 15 लाख
एनएसएल शुगरमध्ये काम करणार्या एका एका कर्मचार्यांची वार्षिक ‘वर’कमाई 10 ते 15 लाख रुपयांच्या आसपास आहे. त्यांना मिळणारा पगार वेगळाच. अर्थात सगळेच कर्मचारी यात गुंतले आहेत असेही नाही परंतु बहुतांश कर्मचारी गिरीश लोखंडे यांच्या प्रमाणेच हात धुवून घेत आहेत.
झापड नाही, शेतकरी हार घालतील…
लोखंडे साहेब, हा कारखाना शेतकर्यांना नव संजिवनी देणारा आहे. शेतकर्यांच्या जिवनात आर्थिक क्रांती घडवून आणणारा आहे. त्यामुळे चांगलं काम करीत राहा. शेतकर्यांची होणारी लुटमार थांबवा. खिसेकापू आणि दरोडेखोर यांच्यात आणि तुमच्यात काहीतरी फरक आहे हे ऊस उत्पादकांना दिसू द्या. तुमच्या अवती-भोवती ज्या दलालांच्या टोळ्या माजल्यात त्यांना दूर करा. तुम्हाला कदाचित वाटत असेल आपल्याला कोणी बघत नाही. डोळे मिटून दूध पिणार्या मांजरीला देखील तुमच्यावाणीच वाटते. त्यामुळे या भ्रमातून थोडं बाहेर पडा.
लोखंडेंच्या चरणावर फुलं वाहणार्यांनी थोडं शेतकर्यांचंही पहावं
एनएसएल शुगरच्या अधिकार्याला झापड पडल्याबरोबर अनेक नेते/पुढार्यांनी एनएसएल शुगर फॅक्ट्रीवर जाऊन लोखंडेंच्या चरणावर फुलं वाहीली. इतकं वंगळ दृश्य यापुवी कधीच कोणी पाहीलं नव्हतं. आता त्या प्रत्येक पुढार्याने आपआपल्या दैवतांना साक्षी ठेवून सांगावं… ‘लोखंडे साहेब लैच निर्मळ मनाचा, अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. त्यांचा शेतकर्यांच्या लुटीला अजिबात पाठींबा नाही’. आहे का अशी जाहीरपणे सांगायची हिंमत? असेल हिंमत तर तसे आम्ही छापू आणि नसेल तर आता लोखंडेंचे कान पिळण्याची तयारी करा. शेतकर्यांची होणारी लूट थांबवा, अन्यथा ऊसाच्या नोंदी खालीवर करणार्या औलादींना बांधावर ऊसाच्या टिपराने शेतकरी सोलून काढतील. हे सगळं टाळणं लोखंडे साहेबांच्या हातात आहे. उगाच पोलीसांकडे धाव घेऊ नका. आणि कारखाना बंद करण्याची धमकी देखील पुन्हा कधी देऊ नका.
उद्याच्या अंकात वाचा
गेटकेनचा ऊस स्थानिक ऊस उत्पादकांच्या बोकांडी का?