पैसे घेतल्याचा कार्यकारी अभियंत्याचा व्हिडिओ व्हायरल

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

खोडसाळपणा केल्याचा अधिकार्‍याचा दावा

बीड : कामाचे बिल काढण्यासाठी 1 टक्क्याने एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अभियंत्याच्या गाडीचा चालक देखील दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली.

पुरुषोत्तम हाळीकर असे व्हिडिओत दिसत असलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. ते प्रत्येक कामात बिल काढण्यासाठी एक टक्क्यानुसार ‘वसुली’ करत असल्याचा आरोप होत होता. अशातच पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याबाबाबत अशोक काळकुटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असून चौकशीची मागणी देखील केली आहे. परंतु, पवार यांनी कसलीही चौकशी केली नसून ते हाळीकर यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार काळकुटे यांनी केला आहे. या प्रकारामुळे जानेवारीअखेर सेवानिवृत्त होत असलेले हाळीकर मात्र आता अडचणीत सापडले आहेत.

हा खोडसाळपणाचा प्रकार; मी पैसे घेतले नाहीत -पुरुषोत्तम हाळीकर

मी बीड जिल्ह्यात 3 वर्षे काम करताना दिवस -रात्र कष्ट केले. गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माझ्या कामामुळे दुखावलेल्या काही व्यक्तींनी असा व्हिडिओ व्हायरल केला असून हा खोडसाळपणाचा प्रकार असल्याचा दावा कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम हाळीकर यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना केला आहे. याबाबत आपण वरिष्ठांना कळविणार आहे.
Tagged