केज : केज मतदारसंघातील ऊस गणपापासून वंचित राहू शकतो अशी भीती व्यक्त करत तातडीने ऊस गाळपाचे नियोजन करावे, अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी केली होती. याबाबत त्यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र दिले होते. त्याअनुषंगाने आता बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा प्रादेशिक सहसंचालक उद्या (दि.१८) आढावा घेणार आहेत.
केज मतदारसंघातील अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करण्याचे आव्हान साखर आयुक्तालयाच्या औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालकांसमोर असणार आहे. केज मतदारसंघातील ऊस उत्पादकांची मदार असलेला येडेश्वरी साखर कारखाना वगळता अन्य कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. याशिवाय परजिल्ह्यातील कारखान्यांनी कार्यक्षेत्रात (केज मतदारसंघात) येणाऱ्या सभासदांचे ऊस गाळपासाठी नेण्याचे नियोजन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येत्या काळात ऊसाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा ऊस गाळपापासून वंचित राहू शकतो. त्यामुळे साखर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांनी बीड जिल्ह्यातील कारखानदारांची उद्या (दि.१८) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ऊस गाळपाचे नियोजन कसे होते? याकडे लक्ष लागले आहे.