अखेर महसूल संघटनेचा संप मागे

न्यूज ऑफ द डे बीड

राज्य उपाध्यक्ष सुहास हजारे यांची माहिती

बीड : राज्यभरात सुरू असलेला महसूल संघटनेचा संप अखेर बुधवारी (दि.13) मागे घेण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती महसूल संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

मुंबई येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात महसूल कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात सुरु असलेल्या संपाबाबत बैठक झाली. या बैठकीस महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन परीर तसेच सर्व उपसचिव उपस्थित होते. यावेळी महसूल संघटनेचे राज्य अध्यक्ष हेमंत साळवी, उपाध्यक्ष सुहास हजारे, कोषाध्यक्ष राहुल शेटे या पदाधिकार्‍यांनी संघटनेची बाजू मांडली. यावेळी राज्यात अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती देण्याचा निर्णय झाला. सदरील पदोन्नती ही मंत्रालयाऐवजी विभागीय आयुक्तालयातून देण्यात येणार आहे. ही पदस्थापना त्याच विभागात मिळणार आहे. महसूलचा आकृतिबंध तयार करून रिक्त पदे जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येतील. तसेच अनुकंपा नियुक्ती व कोतवाल पदोन्नती ही महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. इतर मागण्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे महसूल संघटनेचा संप मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय झाल्याची माहिती महसूल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुहास हजारे यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.

Tagged