पंकजा मुंडेंच्या सूचनेनंतर बीडीओंची गावास भेट; तात्पुरता निवारा उपलब्ध
केज : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यातील नेतृत्व गुणाची चुणूक पुन्हा एकदा दिसून आली, त्यांच्या एका फोनमुळे कोरेगांव (ता.केज) येथील बालकांना अंगणवाडीच्या इमारतीसाठी एक लक्ष ६७ हजाराचा निधी पंचायत समितीने तातडीने उपलब्ध करून दिला. इमारत होईपर्यंत तात्पुरता निवाराही प्रशासनाने चिमुकल्यांना दिला, जेणेकरून त्यांना उघड्यावर बसावे लागणार नाही. पंकजा मुंडे यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल पालकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
झाले असे, कोरेगांव ता. केज येथील जागरूक नागरिक श्री उमाकांत तांदळे यांनी पंकजा मुंडे यांना १८ जूलै रोजी एक ट्विट करून उघड्यावर बसून शिक्षण घेणाऱ्या बालकांची व्यथा मांडली. “गावांत लहान मुलांसाठी बालवाडी व अंगणवाडीची इमारत नसल्याने आमच्या गावांतील लहान बालके हे उघड्यावर शिक्षण घेत आहेत, आपल्याकडून काही मदत झाली तर विद्यार्थ्यांची गैरसोय वाचेल” असं ट्विट त्यांनी केलं. पंकजाताईनी लगेच याची दखल घेत त्यांना लगेच रिप्लाय केला. “मी फंड मंजूर करून देते प्रक्रियेसाठी वेळ लागेल, तोपर्यंत एखादी शाळा खोली किंवा इतर व्यवस्था पहावी असे बीडीओंना सांगते. दोन दिवसात बीडीओ भेट देतील” असे सांगून केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांना फोन केला व याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. गटविकास अधिकारी मोराळे यांनी सकाळीच कोरेगांव येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व लोकल सेस फंडातून १ लक्ष ६७ हजाराचा निधी उपलब्ध करून दिला. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीला त्याचे प्रशासकीय मान्यतेचे पत्रही सुपूर्द केले. या निधीतून लगेचच अंगणवाडीच्या इमारत बांधकामाला सुरूवात होणार आहे. इमारत होईपर्यंत बालकांना उघड्यावर बसून शिक्षण घेता येऊ नये यासाठी तात्पुरता निवारा करून देण्यात येत आहे. पंकजा मुंडे तातडीने दखल घेत चिमुरड्यांची सोय करून दिल्याबद्दल पालकांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.