mundada

आमच्यावर गुन्हे दाखल करा पण शेतकर्‍यांना न्याय द्या : अक्षय मुंदडा

अंबाजोगाई केज न्यूज ऑफ द डे

केज : शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणार्‍या भाजप आमदारांच्या सासर्‍यांसह तालुकाध्यक्ष अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर केजमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यावरुन भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी टिका केली असून आमच्यावर गुन्हे दाखल करा पण शेतकर्‍यांना न्याय द्या असे म्हटले आहे.

पुढे बोलताना अक्षय मुंदडा म्हणाले, अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रुग्णालय परिसरात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तो प्रकार प्रशासनाला व शासनाला चालतो. आम्ही मात्र शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आंदोलन केले तर भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर तातडीने गुन्हे दाखल केले जातात. आमच्यावर आणखी गुन्हे दाखल करा पण शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहिजे. अद्याप बीड जिल्ह्यात शेतकर्‍यांचे विमा घेण्यासाठी एकही कंपनी नाही. सोयाबीन उगवले नसल्याचे पंचनामे नाहीत. पीक कर्ज वाटप होत नाही. कांदा चाळ, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळे आदी योजनांचे शेतकर्‍यांचे करोडो रुपये अनुदान वाटपही नाही. राज्यपालांनी जाहीर केल्यानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीनच्या अनुदानाचे अनेक गावात वाटप झालेले नाही. अशा पद्धतीने राज्य सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. त्याच शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी भाजपच्या वतीने कायदेशीर मार्गाने दाद मागितल्यास गुन्हे दाखल केले जातात. मात्र अंबाजोगाईच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला तरी गुन्हे दाखल होत नाहीत, हा प्रशासनाचा आणि शासनाचा दुटप्पी आहे. तुम्ही किती ही गुन्हे दाखल करा पण आम्ही शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून सतत प्रयत्न करणार. यापुढेही भारतीय जनता पक्ष शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत राहणार असा इशारा भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी दिला आहे.

Tagged