corona

गेवराईत निघाले 28 ‘सुपर स्प्रेडर’

न्यूज ऑफ द डे बीड

बहुतांश व्यापार्‍यांचा समावेश

गेवराई, दि.5 : गेवराईत शहरात भिलवाडा पॅटर्न राबविण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल 28 जण सुपर स्प्रेडर असल्याचे आढळून आले. शहरात दिवसभरात 1310 जणांच्या अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात ही धक्कादायक बाबा आढळून आली.

गेवराई शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह 6 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारपासून शहरातील व्यापारी, फेरीवाले, दुधवाले व जे जे दिवसभरात जास्त लोकांच्या संपर्कात येतात त्यांच्या अ‍ॅन्टीनज टेस्ट घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज दिवसभरात 1310 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यात तब्बल 28 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

या प्रयोग यशस्वी करण्यासाठी गेवराईचे तहसिलदार प्रशांत जाधवर, आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कदम, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर राजेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्यासह आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले

अ‍ॅन्टीजेन टेस्ट म्हणजे काय?
रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी संशयितांच्या नाकातून नमूना घेतला जातो. त्यानंतर तो किटमध्ये टाकून तपासणी केली जाते. अर्धा ते दोन तासात अशा टेस्टचा रिपोर्ट येतो. यामुळे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागात लवकर रुग्ण शोधण्यास गती मिळते. रिपोर्ट लवकर येत असल्याने मृत्यूचं प्रमाण कमी करता येऊन संसर्ग होण्याची पुढील साखळी खंडित करता येते. अशी चाचणी करण्यासाठी कुठल्याही लॅबची आवश्यकता भासत नाही. आययीएमआरने अशा चाचण्या करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या चाचणीसाठी लागणार्‍या किट दक्षिण कोरियाच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय देखरेखीखालीच या टेस्ट केल्या जातात.

‘सुपर स्प्रेडर’ म्हणजे काय?
‘सुपर स्प्रेडर’ म्हणजे असे व्यक्ती जे मोठ्या प्रमाणावर दरदिवशी इतर लोकांच्या संपर्कात येतात. अर्थात सर्व प्रकारचे दुकानदार, फळ-भाजी, दूध, पेट्रोल विक्रेत्यांसह बँक कर्मचार्यांचा ‘सुपर स्प्रेडर’मध्ये समावेश आहे.

काय होते नियोजन?
या पॅटर्न अंतर्गत बुधवार आणि गुरुवारी शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी, दूध, पेट्रोल विक्रेत्यांसह बँक कर्मचार्यांच्या कोरोनाच्या अँटिजेन टेस्ट होणार आहेत. याचे सर्व नियोजन बँक कर्मचारी, विक्रेत्यांच्याच मदतीने होत आहे. त्यासाठी व्यापारी महासंघ, फळ विक्रेते, दुध विक्रेते यांचं सहकार्य घेतले जात असून प्रत्येक ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन डाटा ऑपरेटर असे एकूण 30 कर्मचारी कार्यरत आहेत.

पाच ठिकाणी केल्या टेस्ट
नगर परिषद कार्यालय, र.भा.अट्टल विद्यालय, नगर परिषद हॉल, शिवाजी चौक, पंचायत समिती कार्यालय व कन्या प्रशाला अशा सहा ठिकाणी टेस्ट घेण्यात आल्या.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged