क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी साधना वाघ यांची कोरोनावर मात

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

कोरोना योद्धा साधनाचे कुटूबींयानी केले स्वागत

 बीड :  येथील जिल्हा रुग्णालयामध्ये क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या साधना राजेंद्र वाघ (मस्के) यांना कोरोनाची लागण झाली. घाबरुन न जाता त्यांनी योग्य उपचार पद्धतीघेवून केवळ नऊ दिवसात कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये त्यांना कुटूंबासह मित्रपरिवाराने मोठा धीर दिला. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात करु शकले अशी प्रतिक्रिया साधना वाघ यांनी दिली.
       कोरोनाचे जागतिक संकट आल्यापासून आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, सफाई कर्मचारी व अत्यावश्यक सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणारे आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. कोविड कक्षात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्रयत्नांची पराकाष्ठा करत कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. जिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण विभागामध्ये क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती साधना राजेंद्र वाघ (मस्के) यांनी मध्यंतरी कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी काम केले. त्यानंतर त्यांना स्वतःमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांनी अ‍ॅन्टीजन टेस्ट दिली. यामध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आला. पंरतु लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी कुणाच्याही संपर्कामध्ये न जाता परत स्वॅब देण्याचे ठरवले. स्वॅब दिल्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. या दरम्यान त्यांच्या संपर्कात पती आल्यामुळे त्यांचाही स्वॅब घेण्यात आला. सुदैवाने त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. साधन वाघ यांनी माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. यावेळी डॉ.सदाशिव राऊत, डॉ.सवासे, शिला मुंडे यांनी मार्गदर्शनासह धीर देत सहकार्य केले. योग्य उपचार पद्धतीमुळे त्यांनी नऊ दिवसामध्ये कोरोनावर यशस्वी मात केली. शुक्रवार दि.4 सप्टेंबर रोजी कोरोनाला हरवून त्या घरी पोहोचल्या. यावेळी घरी आल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांनी त्यांचे आनंदात स्वागत केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी काळजी घ्यावी, गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच कोरोनाला घाबरुन जाऊ नये. परंतु काळजी घ्यावी असे अवाहन साधना वाघ यांनी केले.

Tagged