jayakwadi, nathsagar

नाथसागराचे बारा दरवाजे उघडले

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण, दि.6 : येथील नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असल्याने व धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस् सुरु झाल्याने धरणाचे बारा दरवाजे आतापर्यंत उघडण्यात आले असून 7877 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदाकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी दुपारपासून गोदापात्रात विसर्ग सुरु आहे. शनिवारी दुपारी 12:30 वाजता धरणाचे 10 व 27 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे अर्धा फूट उचलून 1048 क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी 6:30 च्या दरम्यान पुन्हा 18 व 19 क्रमांकाचे दरवाजे अर्धा फुटाने उचलण्यात आले. त्यानंतर पुन्हा रात्री आठ वाजता दरवाजा क्र 16, 21, 14, 23 अर्धा फूट उघडण्यात आले. तर रात्री दहा वाजता धरणाचे आणखी चार दरवाजे उघडण्यात आले. अशाप्रकारे आता 27 दरवाजांपैकी 12 दरवाज्यातून 7877 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, अशी माहिती सहाय्यक अभियंता संदीप राठोड आणि पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दैनिक ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.

धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके, तलाठी मंडळ अधिकारी तसेच पाटबंधारे विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे यांनी गोदाकाठावर असलेल्या 14 गावाची पाहणी सुरू केली करून दक्षतेचा इशारा दिला आहे.

Tagged