kangana ranavat

सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया, ड्रग्ज तस्कर हे आदित्यचे साथीदार

देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

कंगनाचे ट्विटरद्वारे गंभीर आरोप

मुंबई : कंगना आणि शिवसेना नेते यांच्यातील वाद मागील काही दिवसांपासून सुरुच आहे. रोज आरोप प्रत्यारोप होत असून कंगनाने आता गंभीर आरोप केले आहेत. मुंबई दौर्‍यानंतर कंगना हिमाचल प्रदेशमध्ये परतली असून तिकडे जावून आणखी भडक विधानं सुरु केली आहेत. तीने एका ट्विटमध्ये चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया, ड्रग तस्कर यांचे साथीदार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या वादाला आणखी नवीन तोंड फुटले असून शिवसेना हे आरोप कशा पद्धतीने घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
         कगंनाने सोमवारी 5 च्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई करत असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणते, ’महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूळ समस्या अशी की मी मुव्ही माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. ही सगळी मंडळी ठाकरे यांचे लाडके चिरंजीव आदित्य यांच्यासोबत असतात. हा माझा मोठा अपराध आहे. म्हणूनच माझा बंदोबस्त करण्यामागे ते आहेत. पण ठिके. आता बघू कोण कुणाचा बंदोबस्त करतो.’ कंगनाच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात धरणीकंप येण्याची शक्यता आहे. आजवर केलेल्या ट्विटपैकी पहिल्यांदाच कंगनाने उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान देत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. सुशांतच्या हत्येत सहभागी असणारे, अमली पदार्थाच्या तस्करीत असणारे आदित्य यांचे साथीदार असल्याचे दोन गंभीर आरोप कंगनाने केले आहेत. यावर अद्याप आदित्य वा ठाकरे यांच्याकडन काही प्रतिक्रिया मिळालेली नाही. कंगनाने रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. महाराष्ट्रात आल्यानंतर तिने मुंबईबद्दल गरळ ओकणं चालू ठेवलं होतंच. पण आता हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या घरी पोचल्यानंतर तिच्या वक्तव्यांना धार चढली आहे. सुशांतसिंहची हत्याच झाली असून मुव्ही माफिया, अमली पदार्थाच्या तस्करीत असलेले यांनी मिळून त्याची हत्या केल्याचं कंगनाने सांगितलं होतं. आता तिने थेट आदित्यचे नाव घेतल्याने हे प्रकरण आता गंभीर बनलं आहे.

Tagged