नाथसागराचे 18 दरवाजे पुन्हा उघडले

न्यूज ऑफ द डे माजलगाव

18 हजार 864 क्युसेकने केला विसर्ग

पैठण : नाथसागराच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रविवारी धरणाचे 18 दरवाजे प्रत्येकी एक फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरीत 18 हजार 864 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. असे असले तरी महसूलचे पथक मात्र रविवारच्या सुटीत असल्याने पाणी किती सुटले याबाबत कुठलाही सावधानतेचा इशारा देण्यात आला नव्हता.

   पावसामुळे पैठण शहरासह ग्रामीण भागातील पाचोड, विहामांडवा, बिडकीन, ढोरकीन, चितेगाव, पिंपळवाडी, दावरवाडी, नांदर, आपेगाव, नवगाव, हिरडपुरी, रांजणगाव, लोहगाव, बालानगर येथील नागरिकाचे जनजीवन विस्कळीत होऊन या परिसरातील छोट्या-मोठ्या नदी नाल्याला पुन्हा एकदा पुराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे येथील 100 टक्के भरलेल्या नाथसागर धरणामध्ये पाण्याची मोठी आवक निर्माण होणार असल्याने पाटबंधारे विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, यांनी दुपारी नाथसागराचे 18 दरवाजे क्र 10, 27, 18, 19, 16, 21, 14, 23, 12, 25, 11, 26, 13, 24, 15, 22, 17, 20, हे एक फुटाने उघडण्यात येऊन गोदावरी नदीत 18 हजार 864 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या सरकारी सुट्टी असल्याने गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देणारे महसूल विभागाचे पथकातले तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी सध्या भूमिगत झालेले आहे. दरम्यान नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रविवार रोजी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे नाथसागर धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे धरण परिसरामधील छोट्या-मोठ्या नदी नाल्याचे पाणी रात्री उशिरा धरणांमध्ये दाखल होणार आहे. सद्यस्थितीत नाथसागर धरण पूर्ण क्षमतेने यापूर्वीच भरलेले आहे. येणार्‍या पाण्याची आवक लक्षात घेऊन गोदावरी नदीमध्ये रात्री 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.

पिकांचे मोठे नुकसान
पैठण शहरासह ग्रामीण भागातील पाचोड, विहामांडवा, बिडकीन, ढोरकीन, चितेगाव, पिंपळवाडी, दावरवाडी, नांदर, आपेगाव, नवगाव, हिरडपुरी, रांजणगाव, लोहगाव, बालानगर येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरातील छोट्या-मोठ्या नदी नाल्याला पुन्हा एकदा पुराचे स्वरूप आले आहे.

Tagged