सौताडा धबधब्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

दारुच्या नशेत असल्याची माहिती

तांबाराजुरी : दारुच्या नशेमध्ये धबधबा परिसरामध्ये फिरणार्‍या तरुणाचा तोलजाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.1) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली असून धबधबा परिसरातील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
राहुल गोसावी (रा.गेवराई) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो काही मित्रासोबत सौताडा येथे धबधबा पाहण्यासाठी आला होता. धबधब्यावरुन त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला. येथील प्रशांत घुले, दत्तात्रय भालेराव, संदीप सानप, राम भालेराव या तरुणांनी पाण्यात उडी घेऊन त्यास बाहेर काढले. वन खात्याचे वनरक्षक भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे, पत्रकार संजय सानप यांनी त्यास पाटोदा ग्रामीण रुग्णालय येथे हलवले. मात्र तपासणी केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. राहुल हा दारुच्या नशेत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. या प्रकरणी पाटोदा पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोकॉ.तांदळे, तांबे करत आहेत.

मंदिर बंद असतांनाही धबधबा
पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

श्री क्षेत्र रामेश्वर येथे यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने धबधबा वाहत आहे. याचेच आकर्षण म्हणून राज्यातील अनेक ठिकाणाहून पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. येथे श्री रामचंद्र यांचे देवस्थान आहे. सध्या कोरोना संकटामुळे मंदिर बंद असलेतरीही रोज हजारो पर्यटक गर्दी करत आहेत. प्रशासनाने येथील सुरक्षेत वाढ करण्याची गरज आहे.

Tagged