सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई
गेवराई दि.21 : चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी करणार्यांनी गेवराई तालुक्यात साठा करुन ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मिळाली. त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.21) गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील शेतात छापा मारला असता यावेळी 17 चंदनतस्कर आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 7 लाख 87 हजाराचे चंदन, दुचाकी असा 9 लाख मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वीस जणांवर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन तस्करांवरील या कारवाईने खळबळ उडाली आहे.
गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील विष्णू साहेबराव बांगर हा बेकायदेशीररित्या स्वतःची फायद्यासाठी काहींना सोबत घेवून परिसरातील चंदनाची झाडे तोडत आहे. तसेच मोरवाड येथील स्वतःच्या शेतामध्ये पत्र्याच्यामध्ये चंदनाचा गाबा काढून पांढर्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांना मिळाली. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांच्या टिमने शुक्रवारी छापा मारला. यावेळी 17 इसम जागीच मिळून आले. त्यांच्या ताब्यातील पत्र्याचे शेडची व परिसराची पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी पांढर्या 16 पोत्यामध्ये 328 किलो चंदनाच्या झाडाच्या खोडा मधून काढलेला चंदनाचा गाबा अंदाजे किंमत 7 लाख 87 हजार, चार दुचाकी, मोबाईल, चंदन तोडण्यासाठी लागणारे साहित्य असा 9 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडलेले 17 आरोपी व फरार तीन अशा वीस जणांवर सपोनि.संतोष मिसळे यांच्या फिर्यादीवरुन चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक फौजदार शफी इनामदार, पोह.बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोना राजू वंजारे, महादेव सातपुते, संजय टुले यांचा कारवाईत सहभाग होता.