remdesivir

रेमडेसिवीरचे तालुकास्तरावर होणार रजिस्ट्रेशन; प्रशासनाचे आदेश

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड- रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एका रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी माराव्या लागणार्‍या चकरा अखेर बंद करण्याचा निर्णय उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी घेतला आहे. त्यांनी सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना आपल्या तालुक्यातील खासगी हॉस्पिटलची मागणी नोंदवून ती जिल्हा प्रशासनाला मेलवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले आहेत.

प्रविण धरमकर यांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व तहसीलदार यांना सूचना करण्यात येते की, त्यांचे तालुक्याचे कार्यक्षेत्रातील खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये भरती असलेले रुग्णांना, जर त्यांचे फिजिशियन यांनी रेमडीसिविर इंजेक्शन देणे आवश्यक आहे अशी शिफारस केली असल्यास, आपले स्तरावर त्यांची यादी करून मेलवर इकडील कार्यालयास पाठवावी.
संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि मेडिकल सुपरिटेंडेंट यांना इंजेक्शनचा पुरवठा करता येईल. जेणेकरून रुग्णांना बीड मुख्यालयी येऊन आयटीआय येथे रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडणार नाही .

बीड जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होईल त्यानुसार तो एजन्सीकडून उपलब्ध करून घेऊन अनुक्रमे आपले नोंदणीप्रमाणे प्रत्येक रुग्णास एक याप्रमाणे त्यांचे रुग्णालयास (कोविड हॉस्पिटल) वाटप करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. हे सेंटर आज (25 एप्रिल) किंवा 26 एप्रिल सकाळपासून कार्यान्वित होतील. स्थानिकचे सामाजिक कार्यकर्त्यांनी हे सेंटर आजच्या आज तातडीने सुरु कसे होतील, यासाठी प्रशासनाची समन्वय ठेवून कार्यात सुसुत्रता आणावी अशी विनंती रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.



‘कार्यारंभ’ने केला सततचा पाठपुरावा
रेमडेसिवीरच्या बाबतीत ‘कार्यारंभ’ने वेळोवेळी आवाज उठवून प्रशासनाच्या त्रुटीवर बोट ठेवत प्रहार केले होते. पुर्वी इंजेक्शन आले किती गेले किती याचाच हिशोब प्रशासनाला किंवा जिल्ह्याला मिळत नसे. मात्र कार्यारंभने हा विषय लावून धरला. आणि मग प्रशासनाने कुणाला इंजेक्शन मंजूर केले त्याची यादी प्रसिध्द करायला सुरुवात केली. त्यानंतर ‘कार्यारंभ’ने तालुकास्तरावर रजिस्ट्रेशन करून रुग्णांना तिथेच इंजेक्शन देण्याची मागणी लावून धरली, या मागणीस समाजातील सामाजिक कार्यकर्ते अमरनाना नाईकवाडे, फारूक पटेल, वंचितचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर, गणेश ढवळे लिंबागणेशकर, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष प्रशांत डोरले, विनोद चव्हाण यांच्यासाह इतर कार्यकर्ते अग्रभागी होते. दोन दिवसांपुर्वी आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखालीही सगळ्यांनी जिल्हाधिकार्‍यांना घेराव घातला होता. त्यानंतर आज हा निर्णय झाला आहे.


पालकमंत्र्यांनी घेतली दखल
‘कार्यारंभ’मधील वृत्ताची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत तातडीने जिल्हाधिकार्‍यांना सांगून या रांगा बंद करण्याबाबत आदेश दिले होते. जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या यंत्रणेला सांगत आज तातडीने त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली. पालमंत्र्यांचे देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून आभार व्यक्त होत आहेत.

Tagged