बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बीड : राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. जिल्हा तिसऱ्या गटात येत असल्याने आता आजपासून (दि.६) सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल, सलूनसह सर्व दुकाने उघडता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्याचे सर्व दिवस तर इतर दुकाने शनिवार, रविवार वगळता इतर ५ दिवस उघडता येणार आहेत.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शनिवारी रात्री उशिरा जारी केले आहेत. आदेशात म्हटल्याप्रमाणे, जिल्ह्यातून आंतरजिल्हा प्रवसासाठी ई -पासची देखील गरज पडणार नाही. ५ गटात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे निर्बंध हटविण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटात आहे. याठिकाणी अत्यावशक आणि इतर सर्व व्यवहार आता सुरु करता येणार आहेत. फक्त त्यासाठी वेळेचे मर्यादा घालून देण्यात आली आहे. हॉटेल ५० टक्के क्षमतेने आठवड्यातील ५ दिवस सुरु करता येणार आहेत. दुपारी ४ नंतर हॉटेलला पार्सल सेवा देता येईल. सलून देखील दुपारी ४ वाजेपर्यंत आणि ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. ज्या ठिकाणी साईटवर मजुरांच्या राहण्याची सोय आहे अशी बांधकामे देखील सुरु करता येतील. क्रीडांगण, मैदाने, पार्क सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर चित्रपटगृहे आणि मॉल मात्र बंदच राहणार आहेत. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असून खाजगी वाहतुकीसाठी पासची आवश्यकता राहणार नाही.
या वेळेत असणार संचारबंदी, जमावबंदी
५ वाजेपर्यंत जमावबंदी, त्यानंतर संचारबंदी आता बीड जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू असतील, तर त्यानंतर सायंकाळी ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल.