dhananjay munde

मराठवाड्यात फक्त बीड जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम राहणार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

पालकमंत्री धनंजय मुंडे आज घेणार आढावा

मुंबई/बीड : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर बीडसह उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मराठवाड्यात फक्त बीड जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम असणे ही चिंताजनक बाब असल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज (दि.30) तातडीने आढावा घेत आहेत. प्रशासनाला ते काय सूचना करतात? याकडे लक्ष असणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात आला. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, निर्बंध हटवण्यात आलेल्या 25 जिल्ह्यांव्यतिरिक्त उरलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. तर तिथे बाधितांची संख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

या निर्बंधांमध्ये येणार शिथिलता
बैठकीतील सर्व चर्चेदरम्यान, मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे. ज्या 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, त्या जिल्ह्यातही शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू आणि फक्त रविवारी बंद असतील. खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास अशा ठिकाणी 50 टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल. थिएटर्स, व्यायामशाळा यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळू शकते. एसी हॉलमध्ये गर्दी होऊ नये, लग्नात, राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंधांचा जीआर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर काढला जाईल, असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

Tagged