court

मुलाच्या खून प्रकरणी बापाला सात वर्षे सक्तमजुरी

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई : सतत दारू पिऊन कर्जबाजारी झालेल्या पित्याने कर्ज फेडण्यासाठी एक एकर जमीन विकली. याच कारणावरून बाप-लेकात झालेल्या भांडणात मुलाचा मृत्यू झाला. या मुलाच्या खून प्रकरणी पित्याला अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजारांचा दंड गुरुवारी ठोठावला आहे.

भागवत जाधव (वय ५२, रा.विडा ता.केज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच कर्जबाजारी झाला आणि कर्ज फेडण्यासाठी एक एकर जमीन विकली. या कारणावरून आरोपी व मयत मुलगा यशवंत यांच्या दि.३१ जुलै २०२० रोजी दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास भांडण झाले. यात आरोपी भागवत जाधव याने मुलगा यशवंत याचे डोक्यामध्ये व तोंडावर दगडाने मारून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान यशवंतचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध केजमध्ये गु.र.नं. २९५/ २०२० – कलम-३०२ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद झाला. पोलीस उपनिरीक्षक एस. एम. काळे यांनी तपास करून आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. अंबाजोगाईच्या सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात चाललेल्या या प्रकरणात (क्र.५१/ २०२०) फिर्यादीतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल अॅड शिवाजी व्ही. मुंडे यांनी बाजू मांडली. त्यांना वरीष्ठ सरकारी वकिल अॅड. अशोक व्ही. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले आणि कोर्ट पैरवी म्हणून पो. हे कॉ. गोविंद कदम, पो.ना. बी. एस. सोडगीर व पो. कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी सहकार्य केले.

Tagged