vinayak mete

मजूर, शिपाई, वेटर, भाजी विक्रेता ते ठेकेदार अन् आमदार

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

अत्यंत खडतर परिस्थितीत पुढे आले होते विनायक मेटे vinayak mete यांचे नेतृत्व

बालाजी मारगुडे, बीड
केज तालुक्यातील अगदी छोट्याश्या राजेगाव गावात विनायकराव मेटेंचा vinayak mete जन्म झाला. आई-वडील स्वतःच्या तुटपुंज्या शेतीत राबून कुटुंबाची गुजराण करणारे. विनायक हे कुटुंबातील दुसर्‍या नंबरचे. आणखी दोन भाऊ आणि एक बहीण असं मिळून सहा जणांचे हे कुटुंब. 1972 च्या दुष्काळात रस्त्याच्या कामावर खडी फोडून, वळणं खांदून बरबडा, सुकड़ी खाऊन जगलेलं. अशाप्रकारे जन्मापासून जगण्याचा संघर्ष करीत आलेल्या विनाकरावांच्या अंगी विद्रोहाचा गुण ठासून भरलेला. चौथीत गावच्या शाळेत शिकत असतानाच त्यांनी त्याकाळी केलेल्या विद्रोहाने जिल्ह्याचा शिक्षण विभाग हादरला होता. शिक्षकांनी ‘ऐनवेळी खेळाच्या स्पर्धा रद्द केल्याने त्या शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा निषेध म्हणून विनायकराव मेटेंनी गावभर निषेधाचे फलक लावून खळबळ उडवून दिली होती.

सातवीची शाळा शिकण्यासाठी पुढे त्यांनी कळंब गाठले. पण घरची परिस्थिती बेताचीच असल्याने ते जेमतेम दोनच वर्ष शिक्षण घेवू शकले. एक वर्ष घरीच शेतीची कामे केले मात्र आता त्यांना शिक्षणापासून दूर रहावत नव्हते. म्हणून त्यांनी जवळच असलेले नाव्होली गाव गाठून घरच्यांच्या परस्पर नववीत प्रवेश घेतला. दररोज 5 किलोमीटर पायी चालून शाळा शिकली. पण इथे त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेत एकाही महापुरुषांची जयंती साजरी केली जात नाही. त्यांच्या मनाने तेथेच बंड केले आणि मुख्याध्यापकांना याचा जाब विचारला. परंतू सर्वांनी टोलवाटोलवी केली. मग विनायकराव मेटे यांनी ग्रामस्थांना एकत्र करुन महापुरुषांच्या जयंत्या साजर्‍या करण्यास सुरुवात केली. पुढे पुन्हा एक बंडाचा प्रसंग आला. शाळेतील शिक्षकांच्या आप आपसातील भांडणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विनायकराव मेटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करीत शाळेवर बहीष्कार टाकला. त्यावेळी पुन्हा एकदा जिल्ह्याचा शिक्षण विभाग चांगलाच हादरुन गेला. शिक्षणाधिकार्‍यांनी गावाला भेट देत शिक्षकांना समजावून सांगितले. आणि शिक्षण सुरळीत सुरु झाले. दहावीला गणित आणि इंग्रजीत आपण पास होणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाहेरगावी कोचिंग लावण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या त्या निर्णयामुळे त्यांना दहावीत 52 टक्के मार्क मिळाले. त्यावेळी गावात फक्त दोघेच पास झाले. त्यात विनायकरावांचा नंबर लागला. पुढे अकरावीला बीडच्या केएसके महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात जनार्धनजी तुपे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटना कार्यरत होती. त्याकाळात शेतकर्‍यांचा आसूड या महात्मा फुलेच्या ग्रंथाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम घेण्यात आला. याच कार्यक्रमापासून मेटे चळवळीशी जोडले गेले. एकदा घरमालक आणि भाड्याने राहाणारे विद्यार्थी यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी बीडमधील सर्व भाडेकरूंनी सुनील धांडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेऊन भाडेकरु विद्यार्थ्यांना सवलत मिळवून दिली होती.

दरम्यानच्या काळात मेटे यांच्या बहीणीच्या लग्नासाठी घरची सर्व जमीन विकावी लागली. त्यामुळे आता कामधंद्याशिवाय आपली गुजराण कशी होणार म्हणून विनायकरावांनी मुंबई गाठली. येथे चेंबूरमध्ये मामांकडे रहात आर.सी.एफ या कंपनीत शिपाई म्हणून नोकरी पत्करली. मात्र काहीच महिन्यात कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे कंपनी बंद पडली. विनायकरावांनी पुन्हा दुसरी नोकरी शोधली. यावेळी त्यांनी भेंडीबाजारमध्ये अक्षरशः एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. दररोज पाच रुपये व वरतून टीप म्हणून मिळणारे काही पैसे असा पगार ठरला. हे काम अतिशय कठीण पण त्याशिवाय गत्यंतर नव्हते. लोकांचा वेटरकडे बघण्याचा तुच्छ दृष्टीकोण पाहून विनायकरावांनी ही नोकरी सोडून बाजुच्याच चप्पल-बुटाच्या दुकानात काम केले. मात्र इथेही त्यांचं मन रमत नसल्याने त्यांनी भिवंडीला जाण्याचा निर्णय घेतला. कारण तिकडे मराठवाड्यातील बरीचशी मंडळी राहात असल्याचे त्यांना समजले होते.

या ठिकाणी आल्यानंतर ते एका कापड मीलमध्ये शिपाई म्हणून नोकरीस लागले. काहीतरी नविन करण्याचा गूण जन्मतःच अंगी असल्याने त्यांनी या मीलमध्ये हातमाग यंत्र शिकून पँटचे कापड बनवायला घेतले. मात्र इथेही कामगारांनी संप केल्याने ही मील बंद पडली. पुन्हा नोकरीचा शोध सुरु झाला. त्याकाळी मुंबईमधील बर्‍याच कापड मील बंद पडल्या. बेकारीची लाट निर्माण झाली होती. इतक्यात कोणीतरी सांगितल की भाजी विकून खूप पैसे मिळतात. त्याचक्षणी त्यांनी एक टोपली विकत घेतली आणि तिथून पहाटे ट्रकद्वारे ठाणे गाठले. तिथून एका रेल्वेने भायखळा गाठून भाजी विकत घेऊन परत बसने भिवंडीला पोहोचले. या ठिकाणी गल्लोगल्ली फिरुन डोक्यावर टोपली घेत ‘भाजी घ्या भाजी’ असे ओरडून त्यांनी भाजी विकली. आपण इतकी मेहनत करुनही लोक भाव पाडून मागतात, या प्रकाराने त्यांना प्रचंड चीड आली. स्वत: च्या दारिद्र्याची किव यायला लागली. डोळ्यात अश्रू दाटून आले. परंतू आता कोणासमोर रडलो तर दुबळेपणाचे लक्षण होईल म्हणून त्यांनी एकट्यानेच दूर एका झाडाखाली जात डोळ्यात सांठलेल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. भाजी विकण्याचे काम चार ते पाच महिने केल्यानंतर त्यांनी हाही व्यवसाय बंद करण्याच्या निर्णय घेतला.

त्यांचे मोठे बंधू त्रिंबकराव त्याकाळी मुंबईतच पेंटरचे काम करीत होते. मग विनायकराव मेटेंनी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी मुंबईत अनेक इमारतींना रंग देण्याचे काम केले. त्याकाळात ते चेंबूरमधील ईस्टर्न हायवे (ठाणे रोड) येथे झोपडी करून रहात. त्यावेळी पावसाने तिथे चिखल व्हायचा. तेव्हा झोपडीला लावायची फळी अंथरून ते त्यावर झोपायचे. प्रचंड त्रास, अनंत अडचणी पण कधीच कामावरचा विश्वास ढळू दिला नाही.

याच काळात त्यांच्या बंधूना मुलुंडमध्ये एका ईमारतीच्या कामावर सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली. मग विनायकरावांनीही त्यांच्या मागे जात तेथील मिस्त्रींच्या हाताखाली काम करीत सहा ते सात मजले चढून वाळू आणि सिमेंट टाकण्याचे काम केले. या कामात त्यांना प्रचंड शारिरिक त्रास झाला. पण केवळ रहाण्याची सोय आहे म्हणून त्यांनी सात – आठ महिने हा त्रास सहन केला. हळू हळू त्यांनी सुपरवायझरचे काम शिकून घेतले. मोठे बंधू गावी गेल्यानंतर त्यांना तिथेच सुपरवायझरचे काम मिळाले. या काळात अनेक मोठ्या बिल्डरांच्या ओळखी झाल्या. या ओळखीचा फायदा उचलून त्यांनी रंग काम करण्याचे ठेके मिळवले. यातून आरे कॉलनी, जे.जे. हॉस्पिटल, आमदार निवासची रंग देण्याची कामे त्यांनी स्वतः केली आहेत. दरम्यानच्या काळात आर्थिक परिस्थिती कितीही घसरली तरी त्यांनी मराठा महासंघाशी असलेले नाते तोडले नाही. उलट त्यांनी मराठा महासंघाच्या गिरगाव येथील कार्यालयात राहून संघटनेचे काम केले. त्यातूनच मग संघटनेची व्याप्ती वाढवत नेली. 1990 साली विधानसभा निवडणुका लागल्यानंतर त्यांनी चौसाळा येथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र वय कमी असल्याने त्या जागी दुसर्‍या एकाला उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यावेळी त्या उमेदवाराने महासंघाच्या परस्परच निवडणुकीतील फॉर्म माघारी घेवून संघटनेची फसवणूक केली. त्यावेळी विनायकराव मेटे यांना प्रचंड राग आला. पुढे 90 ते 95 च्या काळात रंगकामाची ठेकेदारी व्यवस्थित झाल्याने अपेक्षीत पैसा मिळू लागला. त्यातून त्यांनी कल्याणमध्ये मोहननगर येथे भाड्याची खोली घेऊन आपलं बस्तान बसवलं होतं.

1995 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. याकाळात त्यांनी राज्यभरातील दलित नेत्यांसोबत चर्चा करुन मराठा आणि दलित यांच्यातील दरी कमी केली. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टिका झाली. संघटनेत विरोध झाला पण त्यांनी हे काम सोडले नाही. पुढे 1995 च्या निवडणुकीत त्यांनी तत्कालिन विरोधीपक्षनेते गोपीनाथराव मुंडे यांची भेट घेऊन युतीला पाठींबा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे मराठा संघटनेत उभी फूट पडली. राज्यात सेना-भाजपची सत्ता आल्यानंतर 1996 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी विनायकराव मेटे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर गेले. राजेगावचा दुष्काळी कामावरील मजूर, शिपाई, वेटर, भाजी विक्रेता, गवंडी काम करणारा मजूर, सुपरवायझर आणि ठेकेदार ते मराठा महासंघाचा सक्रीय कार्यकर्ता चक्क आमदार झाला होता.

आमदार झाले म्हणून मेटेंनी जनतेशी आणि कार्यकत्यांशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. उलट पुढे अनेक प्रसंगावर त्यांनी आंदोलने केली. लढा उभारला. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, मुंबईत आरबी समुद्रात उभे राहणारे शिव छत्रपतींचे स्मारक, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही सगळी देण आ. विनायक मेटे आणि त्यांच्या सहकार्‍यांचीच. आजच्या राजकीय परिस्थितीती कोणी किती आणि काहीही म्हटले तरी या संपूर्ण कामातील आ. मेटेंचं योगदान कुणालाच विसरता येणार नाही. आजही ते पुणे, मुंबई येथे स्पर्धा परिक्षा आणि इतर शिक्षणासाठी येणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करतात.

आतापर्यंत त्यांनी चार वेळा विधान परिषदेत पाऊल टाकले आहे. 2014 मध्ये पहिल्यांदाच ते विधानसभेत नशिब अजमावणार होते अवघ्या काही मतांनी त्यांचा बीड मतदारसंघात पराभव झाला. या पराभवानंतरही त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर संधी दिली. सर्वपक्षीय संबंध, समाजाशी असलेली बांधीलकी, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी या त्यांच्या अंगभूत गुणांमुळे ते आज महाराष्ट्राला सुपरिचित झालेले होते.

वेळेला खूप महत्व देणारे नेते म्हणून मेटे यांची ओळख होती. राजकीय आणि सामाजिक कामामुळे ते रात्रीचाच मोठ्या प्रमाणावर प्रवास करून मुंबई किंवा बीड गाठत असत. आजही ते रात्रीच बीडमधून मुंबईत मराठा आरक्षण प्रश्नावरील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या वाहनाला पाठीमागून आलेल्या जड वाहनाने धडक दिली. मागच्या सीटवर बसलेले विनायक मेटे गाडीतून खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Tagged