शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपजिल्हा प्रमुखाच्याच कार्यालयात केली चोरी

अंबाजोगाई कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई : तालुका शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस अखेर चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी उपजिल्हा प्रमुखाच्या घराशेजारी असलेल्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह उपजिल्हा प्रमुखांच्या नावाचा फलक चोरी केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात आजी-माजी तालुकाप्रमुखासह अन्य पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर, माजी तालुकाप्रमुख सुहास मोहिते ही गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकार्‍यांची नावे आहेत. उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर भागात ते वास्तव्यास आहेत. त्याठिकाणी त्यांच्या घराच्या शेजारीच स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक त्यांनी तयार केले आहे. तेथे संपर्क कार्यालय देखील सुरु आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शुक्रवारी अनावरण न झालेल्या स्मारकाचे व कार्यालयाचे सायंकाळी कुलूप लावून घरी गेले. त्यानंतर त्याठिकाणी ओळखीचे शिवसेनेचेच चार पदाधिकारी व त्यांच्यासमवेत अन्य दोघे अनोळखी त्याठिकाणी रात्री 11.23 वाजता आले. त्यांनी स्मारकाच्या हॉलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर बाहेर आले व त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा व उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी असे नाव असलेले नामफलक घेऊन रिक्षातून निघून गेले. ही चोरीची सर्व घटना घरासमोरील सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद असल्याचेही उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आरोपींविरोधात कलम 457, 380, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय कांबळे हे तपास करीत आहेत.

Tagged