vijaykant-vikram-munde

चला 18 लाख भरा

केज न्यूज ऑफ द डे

‘मुंडे’ पिता-पुत्रांच्या भ्रष्टाचाराच्या ‘विक्रमा’ला जिल्हाधकार्‍यांची वेसन!
बीड : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे हे अध्यक्ष असलेल्या व जि.प.सदस्य विजयकांत मुंडे हे कोषाध्यक्ष असलेल्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठानने खासदार फंडातून मंजूर झालेल्या निधीतील सामाजिक सभागृह मंजूर ठिकाणी न बांधता भलतीकडेच बांधण्याचा प्रताप केला आहे. भलतीकडेच बांधलेल्या सभागृहासाठी उचललेले 18 लाख 71 हजार रुपये तातडीने नियोजन समितीला परत करावेत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. त्यामुळे बापजाद्यांची मालमत्ता समजून मनाला वाट्टेल तिथे सभागृह बांधणार्‍यांना मोठी चपराक बसली आहे. दरम्यान रेणुकामाता प्रतिष्ठानने केलेली अनेक कामे एकतर दिसणारच नाहीत किंवा मग अशीच ठिकाणे बदलून करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रतिष्ठानच्या अनेक कामांची आता चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.

केज तालुक्यातील सारूळ (धावज्याचीवाडी) ग्रामपंचायत येथे खा. रामदास आठवले यांच्या फंडातून सामाजिक सभागृह मंजूर झाले होते. मात्र रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठानने हे सभागृह सदर ठिकाणी न बांधता बीड तालुक्यातील एका गावात बांधले. आपल्या सोईच्या ठिकाणी हे सभागृह बांधले. त्या ठिकाणाशी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देखील विजयकांत मुंडे यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे गावकर्‍यांच्या सोयीसाठी मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहातून भलत्यांचाच ‘विकास’ करण्याचा फंडा जिल्हा परिषद प्रशासनाला हाताशी धरून राबविण्यात आला होता. या प्रकरणात पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी तक्रार केली, तसेच पंचायत समिती सभागृहात चौकशीचा ठराव देखील घेतला. मात्र चौकशी दरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी वेळकाढूपणा करीत तसेच थातूर-मातूर अहवाल देऊन या गैरप्रकाराची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू मंजूर ठिकाणी सभागृह का बांधले नाही याचा खुलासा 7 दिवसात कार्यकारी अभियंत्यांनी करावा आणि त्यासाठी दिलेला 18 लाख 71 हजाराचा निधी नियोजन समितीला परत करावा असे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहेत. तसेच, याप्रकरणी आपल्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई का करू नये? अशी विचारणा केली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. या कारवाईमुळे मुंडे पिता-पुत्रांच्या विकासाचा बुरखा टराटरा फाटला आहे.
पं.स.सदस्य पिंटू ठोंबरे यांचा पाठपुरावा
पंचायत समिती सदस्य पिंटु ठोंबरे यांच्या पाठपुराव्यातून ही कारवाई झाली आहे. तक्रार केली तेव्हा नेहमीप्रमाणे विजयकांत मुंडे यांनी तक्रारीत तथ्य नाही. तक्रारदार आणि पत्रकार हे खंडणीखोर आहेत असा आरोप करणार्‍या बातम्या काही चापलूस मंडळींना हाताशी छापून आणल्या होत्या. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने सत्य अखेर समोर आले आहे. प्रस्थापित नेते मंडळींनी चोर ते चोर अन् शिरजोर हा प्रकार आता तरी थांबवावा अशी प्रतिक्रिया पिंटु ठोंबरे यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, योग्य कार्यवाहीसाठी मदत करणारे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार विनायक मेटे, जि.प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि माध्यमांचे आभार देखील ठोंबरे यांनी मानले आहेत.

Tagged