दिवसाढवळ्या शस्त्राचा धाक दाखवून पोलीस कर्मचार्‍यास लुटण्याचा प्रयत्न

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

शस्त्रासह चौघे पोलीसांच्या ताब्यात;
नेकनूर ठाणे हद्दीतील थरारक घटना

नेकनूर दि.8 :  दिवसाढवळ्या चार चोरट्यांनी दुचाकीवरुन पोलीस कर्मचार्‍याच्या कारचा पाठलाग केला.. रस्त्यात आडवून शस्त्राचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. त्यानंतर पैशांची मागणी केली. परंतु परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलीस कर्मचार्‍याची सुटका झाली. तर चौघांना शस्त्रासह नेकनूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
          पोलीससुत्रांच्या माहितीनुसार, केज पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी समाधान खराडे हे कामानिमित्त चारचाकीने बीडकडे येते होते. बीड तालुक्यातील येळंब (घाट) जवळील ढाणे मंगल कार्यालयाजवळ एका पुलाजवळ चौघाजणांनी त्यांची कार आडवली. खराडे यांना कारच्या बाहेर काढत धारदार शस्त्रे दाखवून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांची सिनेस्टाईल पाहून त्या ठिकाणी जवळपासचे नागरिक जमा झाले. त्यांनाही चोरट्यांनी चाकू दाखवला. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि नेकनूर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी फौजफाटा दाखल झाल्यामुळे पोलीस कर्मचार्‍याची सुटका झाली. मोहम्मद इम्रान मोहम्मद अब्दूल लतीफ (वय 20 रा.औरंगाबाद), मोहम्मद फयाज मोहम्मद आयाज (वय 20 रा.औरंगाबाद), मोहम्मद शेख (वय 18 रा.गुलबर्गा कर्नाटक), मोहम्मद सद्दाम मोहम्मद (वय 28 रा.गुलबर्गा कर्नाटक) या चारही चोरट्यांना गजाआड करण्यात यश आले. या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात रोडरॉबरीसह अन्य कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘गुगल पे वर लाख रुपये टाक’
पोलीस कर्मचारी खराडे यांना मारहाण केल्यानंतर त्यांना शस्त्राचा धाक दाखवत ऑनलाईन गुगल पे वर एक लाख रुपये टाकण्याची मागणी दरोडेखोरांनी केली.

चौघेही सराईत गुन्हेगार
यातील आरोपी दोघे औरंगाबाद तर दोघे कर्नाटक येथील आहे. सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक जिल्ह्यात चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक भास्करराव सावंत यांनी दिली.

Tagged